पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/35

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

याचा अर्थ विणकराला होणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात काही मूलभूत सुधारणा करून देणे हाच त्याची परिस्थिती सुधारण्याचा एकमेव मार्ग आहे असा सरळ होतो. आज हा पुरवठा मुंबईतील सूतगिरण्या, सुताचे व्यापारी व दलाल यांच्या मनमुराद नफेबाजीवर अवलंबून आहे. कच्च्या मालाचा पुरवठा आणि पक्क्या मालाची विक्री या दोन्ही तोंडांकडून सोसायटीची कुचंबणा होत असते. या दोन्ही तोंडावर नफेबाजीची पकड अगदी घट्ट बसली आहे. असे असता आपल्या सहकारी क्षेत्राने स्वतंत्र विकास साधावा, सहकारी अर्थव्यवस्था भांडवलशाही व्यवस्थेचा एक पर्याय म्हणून येथे उभी रहावी ही अपेक्षा पूर्ण होणे शक्य तरी आहे काय ? सहकारी सोसायटीचा फैजपूर पुरता प्रभाव वर्णन करायचा म्हणजे एवढेच म्हणता येईल की, सोसायटीतील विणकरांवर मजुरीबाबत अन्याय केला जात नाही. यापेक्षा विणकर समाजाच्या स्थैर्यावर किंवा विकासावर सोसायटीच्या अस्तित्वाचा प्रभाव जवळजवळ नाही म्हटला तरी चालेल.

मासिक उत्पन्न चाळीस रुपये

पण समजा नगामागे विणकरांना सोसायटीतून मिळणारी तीन रुपये मजुरी मिळाली! एक खणाळे तयार व्हायला सरासरी दोन दिवस लागतात. विणकराबरोबरच अधूनमधून त्याची बायकोमुलेही या कामात गुंतलेली असतात हेही ध्यानात घतल पाहिजे. या विणकर कुटुंबाच्या श्रमातून महिन्याकाठी जास्तीत जास्त १५ खणाळी तयार होऊ शकतात. या पंधरा खणाळ्यांची मजुरी झाली रुपये पंचेचाळीस केवळ. हे झाले विणकर कुटुंबाचे मासिक उत्पन्न. एवढेही त्याच्या पदरात केव्हाच पडत नसत. कारण खणाळी मागावरून काढणे, ती सोसायटीत नेऊन देणे, पुन्हा माग चालू करणे यात वेळ जातो. शिवाय लग्नसराई, आजारपण यातही दिवस मोडतात. त्यामुळे महिन्याकाठी १५ खणाळी हे प्रमाण फक्त कागदावरच रहाते, प्रत्यक्षात सरासरी तेरा खणाळीच तयार होतात. म्हणजे मासिक उत्पन्न रुपये चाळीसच्या आतच पडते. व्यापाऱ्यांना माल विकणाऱ्या किंवा व्यापाऱ्यांच्या मागावर काम करणाऱ्या विणकरांचे उत्पन्न एवढेही असत नाही.

या पस्तीस-चाळीस रुपयांत विणकर आपला संसार आजच्या महागाईच्या काळात कसा चालवीत असेल याची कल्पना कोणासही सहज येऊ शकेल.

। २८ ।