पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/202

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'श्रीग्रामायन' हे श्रीगमांचं पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर एकदा केव्हा तरी सहज चाळलं होतं; पण सुमारे चार महिन्यांपूर्वी ते खऱ्या अर्थाने शांतपणे वाचलं आणि असं जाणवलं की, 'खेड्यांचा देश' म्हणून अनेकांनी गौरविलेला ग्रामीण भारत इथे निरनिराळ्या रूपांमध्ये पुढे आला आहे. एखाद्या शोभादर्शकातल्या रंगीबेरंगी काचांच्या मनोहारी रचनांप्रमाणे इथल्या आशा-निराशा, सुख-दु:खं, सुबत्ता-दारिद्रय, प्रकाशाच्या रेषा आणि अंधारलेल्या दिशा इथे चितारलेल्या आहेत. या निरनिराळ्या छटांमागची कारणं शोधणारं मुक्त चिंतनही आहे. शहरातल्या औद्योगिक जगताकडून होणारं ग्रामीण भारताचं शोषण, हा सध्याच्या काळातला सर्वव्यापी विचार या ठिकाणी छायेसारखा वावरतो आहे.

१९६१ ते १९७१ या दशकात श्रीगमांनी वेळोवेळी केलेलं हे लेखन, त्या दशकानंतर आणखी एक दशक उलटून गेलं असलं तरी 'एका इतिहासाची नोंद' असं त्याबाबत म्हणता येत नाही. कारण कालचक्र फिरत राह्यलं असलं तरी 'श्रीग्रामायन' मधल्या चित्रांचे रंग अजून फारसे पालटलेले नाहीत. तिथे उमटलेल्या भावना-विचारांच्या रेषा आजही फारशा पुसट, संदर्भहीन झालेल्या नाहीत. ग्रामीण भारतातलं एखादं ‘ल्हासुर्णे' आहे, तसंच सिंहगडाच्या कुशीतून 'आम्ही गांडुळ खाऊन जगणारी माणसं...' असं बोलणारी म्हातारीही आहे. आजच्या ग्रामीण भारताचं रूप यापेक्षा फारसं निराळं नाही. म्हणून ग्रामीण भारताच्या वाटांचा शोध घेणाऱ्या कोणाही कार्यकर्त्याला 'श्रीग्रामायन' मध्ये रेखाटलेली या ग्रामजीवनाची चित्र आजच्या काळात आणि संदर्भात तितकीच ताजी वाटावीत, अशी आहेत. कदाचित् त्यांना वाट पुसतच एखादा पुढली चित्रं चितारू शकेल !

आणि म्हणूनच ‘श्रीग्रामायन' पुन्हा एकदा वाचकांसमोर यावं, असा आग्रह आम्ही मित्रमंडळींनी धरला. ते वाचल्यामुळे ग्रामीण भागात जाऊन कार्य करण्याची ऊर्मी किती जणांच्या मनात निर्माण होईल, हे सांगणे कठीण; पण सुमारे बारा-पंधरा वर्षांपूर्वीच्या काळातलं लेखन आजच्या काळातही तेवढेच प्रत्ययकारी ठरत असेल, तर त्याची पुनरावृत्ती ही एक गरज आहे. या क्षेत्रात काम करू इच्छिणाच्या कार्यकर्त्यांची आणि या क्षेत्राबद्दल किमान आस्था असणाऱ्या माझ्यासारख्या हितचिंतकांचीही !

-सतीश कामत