पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/179

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाच एप्रिलची रात्र.

दिवसभराची कामे संपवून झोपडीच्या बाहेरच्या मोकळ्या पडवीवर स्वामिजी कंदिलाच्या प्रकाशात काहीतरी लिहीत बसले असावेत.

शेजारच्या झोपडीत गोविंद रेड्डी निजण्याच्या तयारीत होते. येथे बहुधा आश्रमात कायम वास्तव्य करण्याच्या विचाराने ते आलेले असावेत. स्वामिजीही कदाचित रेड्डींवर सर्व जबाबदारी सोपवून मोकळे होण्याच्या विचारात असतील. काय उभयतांचे ठरले होते, ठरत होते याची इतरांना काहीच कल्पना नव्हती.

रेड्डींच्या झोपडीजवळ अचानक पिस्तुलाचे काही आवाज झाले.

स्वामिजी उठत उठत विचारताहेत-रेड्डी, रेड्डी, क्या बात है !

इतक्यात हल्लेखोर समोर दिसलेच.

स्वामिजी चटकन् झोपडीत शिरले. त्यांनी आतून कडी लावून घेतली व म्हणतात की, त्यांनी झोपडीत असलेली एक जुनी तलवार हातात उचलली होती. झोपडीच दार बंद झाल्याचे पाहून हल्लेखोर बाजूच्या खिडकीकडे वळले.

लहानशा झोपडीत अडकलेला माणूस उघड्या खिडकीतून टिपायला कितीसा वेळ लागणार ! देहाची अक्षरशः चाळण झाली.

तो बलदंड पुरुष रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. झोपडीच्या भिंती उडालेल्या रक्त चिळकांड्यांनी माखून निघाल्या. कितीतरी वेळ तो निष्प्राण देह तसाच पडून होता.

–कारण तास-दोन तासांनी खारीचे गावकरी जमले. त्यानंतर पोलीस दोन-चार तासांनी अवतरले. पहाट उजाडली सगळे होईस्तोवर.

दुसऱ्या दिवशी सकाळी देह मरणोत्तर तपासणीसाठी बिजनौरला आणला गेला.

स्वामिजींच्या शवावर गोळ्यांच्या आणि छऱ्यांच्या अनेक खुणा आढळल्या.

कुणीच घटना प्रत्यक्ष पाहिलेली नाही. त्यामुळे अनेक अफवा, तर्कवितर्क.

पोलिसांनी वृत्तपत्रांसमोर ठेवलेली कथा अशी : स्वामिजी दोन-चार गावकऱ्यांबरोबर पडवीत बोलत बसले होते. काही पिस्तुलधारी इसम आले. त्यांनी या गावक यांना निघून जायला सांगितले. गावकरी भीतीने दूर गेले; पण फार दूर नाही. ते आश्रमात काय घडते आहे ते थोडेफार पाहू शकत होते. हल्लेखोरांनी स्वामिजींना प्रथम ठार केले. नंतर ते रेडींच्या झोपडीकडे वळले. एकूण तीनजण होते. आश्रमाजवळून लपून हा सर्व प्रकार पहात असलेल्या गावकऱ्यांपैकी एकाने तिघांनाही ओळखले. दोघांना ताबडतोब अटकही झाली आहे. तिसराही हातात आहे...वगैरे

। १७२ ।