पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/178

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दलांच्या आस्वादासाठी उत्सुक झाला. तासन् तास आकाशाचा वेध घ्यावा, धरित्रीच्या मऊ मुलायम स्पर्शासाठी अधीर व्हावे, असे घडू लागले. नवे विषय, नवे चितन, नव्या कल्पना, नवी झेप-

सुरुवातीला अंकावर फक्त एकच बिरुद असे- A Rural Fortnightly. दोन-चार अंक उलटल्यावर बिरुदे वाढली--

A Bombshell Over Drowsy Intelligentsia A Crusader Against Corruption Pioneer In Socio-Political Research A Debut In Rural Journalism

झोपलेल्या बुद्धिमंतावरचा बाँबवर्षाव, भ्रष्टाचारविरोधी झुंजार आघाडी, सामाजिक राजकीय संशोधनाचा नवा प्रयत्न, ग्रामीण पत्रकारितेचा शुभारंभ...

आणखीएक बिरुद होते, थोडेसे कोप-यात लपलेले. कुणी त्याकडे विशेषसे लक्ष दिलेले नव्हते-A Forum For Research in 'Ideo' Physics. हे शेवटचे प्रकरण इतकी वर्षे फारसे डोकवत नव्हते. यावर्षी मात्र ते एकदम उफाळून वर आले. बहुधा हा शब्दही स्वामिजींनीच हुडकून काढलेला असावा ! प्रत्येक व्यक्तीभोवती त्याच्या जन्मापासूनच एक प्रकाशवलय असते, या वलयाचा शोध घेतला गेला तर व्यक्तिजीवनाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते, असे काहीसे है प्रकरण होते. मग सुरू झाला हा प्रकाशवलयाचा शोध. एक विज्ञानक्षेत्राला अती बुद्धिमान तरुण विद्यार्थीही त्यांना सहकारी म्हणून मिळाला. दोघांनी या ‘Ideo Physics वर जी काही धमाल उडवून दिली आहे म्हणता ! वाचता वाचता पुरेवाट! सगळे प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्र बाहेर पडले. पाश्चात्य ज्योतिषाचा तौलनिक अभ्यास सुरू झाला. तिबेटी लामांच्या साक्षी निघाल्या. अध्यात्माला जागा जास्त मिळू लागली. खगोलशास्त्रात मंडळी घुसली. वाचक स्तिमित होऊन विचारू लागले, स्वामिजी कुठून निघाले, चालले आहेत कुठे ?

स्वामिजी चालले होते तिथेच, जिथे सर्वांनीच जायचे असते; पण कुणीच सहसा फिरकत नसते तिकडे. जीवनाच्या भौतिकतेची सीमा ओलांडल्यावरच दिसू शकणा-या आत्मज्ञानाच्या धवल शिखरांकडे, परंधामाकडे. या परंधामाचा शोध आपल्या बुद्धिप्रधान व्यक्तिमत्वाला साजेशा मार्गाने स्वामिजी घेत होते इतकेच. यात बुवाबाजी, मंत्रतंत्रगिरी वगैरे काही नव्हती. होती ती अनिवार ज्ञानतृष्णा, नव्या नव्या अनुभवांसाठी सदा भुकेलेले असलेले एक विलक्षण समृद्ध मन.

। १७१ ।