प्रार्थना एकणारा भगवान श्रीकृष्ण मात्र दृष्टीपथातही येत नव्हता. किरकोळ लढाया खूप जिंकल्या, लोकप्रियता नाही तरी थोडीफार लोकमान्यता लाभली. पण ते समोरासमोर ससैन्य प्रतिपक्षावर तुटून पडण्याचे वीरभाग्य ! स्वामिजींना हे मनापासून हवे होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ती मागणी होती. ते वीरपुरुषही होते. विरक्त साधूही होते. क्षात्र आणि ब्राह्मतेज त्यांच्या ठायी एकत्रित विलसत होते. हे तेज त्या कुग्रामनिवासामुळे झाकोळले तर जात नव्हते ? त्यांच्या मित्रांना ही शंका येत होती. स्वामिजीही क्वचित, निदान एकांतात तरी, या शंकेने व्याकुळ होत असावेत. चुकून, न कळत एखादा निराशेचा शब्द लिखाणातून बाहेर डोकावे; पण अगदी एखादाच; कारण स्वामिजी पुढच्याच शब्दात स्वतःला सावरूनही घेत: आपली शिकार झाली तरी चालेल, कुणी आपल्यावर दंया मात्र दाखवू नये ही आपली धार ते जराही कमी होऊ देत नसत.
दिल्लीच्या एका ज्येष्ठ पत्रकार मित्राने जरा शिष्टपणाचा आव आणून एकदा लिहिले : अंकाची छपाई केव्हा सुधारणार? त्या खेड्यात कुजण्याऐवजी दिल्लीला या. येथे फार मोठे क्षेत्र आपल्यासाठी खुले होईल.
स्वामिजींनी त्याला तडकावले : कसले क्षेत्र ? पैशाच्या तालावर नाचणाऱ्या गुलामांचेच ना ? शहरातला पत्रव्यवसाय ही पोटभरूंची निव्वळ दुकानदारी आहे. स्वतंत्र विचार तेथे पिकत नाहीत. ताजी पुष्पे तेथे उमलत नाहीत. येथे अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते हे खरे आहे. आमच्या जागी दुसरा कुणीही असता तर वेडा झाला असता, हातात बंदुक घेऊन दिसेल त्याच्यावर गोळ्या घालतच सुटला असता आम्ही आजवर टिकून आहोत याचे कारण ध्येयवादाच्या प्रखर भट्टीत आम्ही आमची जीवने तापवून आटवून पोलादाचा घट्टपणा प्रयत्नपूर्वक त्यांना प्राप्त करून दिलेला आहे. आता ही जागा आम्ही कधीकाळी सोडलीच तर आमच चित्त जेथे रमेल अशा एक-दोनच जागा आहेत-टॉलस्टॉयने जेथे कालक्रमण केली ते यास्नाया पोल्याना जेथून जवळ असेल असे एखादे रशियातील ठिकाण किंवा अमेरिकेत, थोरो जेथे एकांत चितनात रंगून जात असे त्या वॉल्डनच्या सरोवराकाठी कुठेतरी. नाहीतर 'आम्ही येथले तुम्ही तेथले- '
□
नवे वर्ष उजाडले. धार कमी नव्हती; पण धारा जरा वेगळी वाहू लागली स्वामिजी कवी होते. दर अंकात निसर्गवर्णनपर एखादी कविता हमखास प्रसिद्ध होऊ लागली. हिमालयीन वास्तव्याच्या आठवणी निघू लागल्या. कांग्रा खोऱ्यातील वन. मीने दिलेला आनंद दाटून काव्यरूपाने वर उसळू लागला. ग्रहनक्षत्रांचे वेड लागले. आश्रमातील हिरवी लवलव कोवळे कोवळे भाव जागृत करू लागली. नांगरावरचा मजबूत हात मोरपंखांशी खेळू लागला. अध्यात्माचा राजहंस मानससरोवरी कमल-