पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/173

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि थोड्याच दिवसात ते स्वतःही आश्रमात येऊन दाखल झाले. दोन गांधीवादी कार्यकर्ते एका वेगळ्याच मनःस्थितीत पुन्हा एकत्र झाले होते.

दोघांनी पंचवीस वर्षांपूर्वी सेवाग्राममध्ये मोठ्या उमेदीने प्रवेश केलेला होता. गोविंद रेड्डी म्हैसूरहून तुरुंगातून सुटून आलेले-बेचाळीसच्या अंदोलनात त्यांनी भाग घेतलेला होता. स्वामिजी---लाहोर कॉर्पोरेशनमधील झाडूवाल्याची नोकरी संपवून आलेले : सेवाग्रामला गांधीजींकडे जायचे, अध्यात्म साधनेबरोबरच श्रमसाधनेची काही जोड हवी, म्हणून ऋषिकेशचा ‘स्वर्गाश्रम' सोडल्यावर लाहोर कॉर्पोरेशनमध्ये स्वामिजींनी सुरुवातीला ही नोकरी ‘साधना' म्हणून धरलेली होती.

रेड्डी गांधीजींजवळ शेतकामासाठी राहिले. स्वामिजी विनोबांबरोबर गोपुरीपवनारकडे वळाले.

पुढे कोरापुटमध्ये ( ओरिसा ) ग्रामदान कार्यासाठी हे दोघे पुनः एकत्रित आले. रेड्डींनी गरांडा येथे केंद्र चालवले. आदिवासींना शेतीचे नवे तंत्र त्यांनी शिकवले. स्वामिजींकडे Gramdan Monthly या इंग्रजी मासिकाचे संपादन करण्याचे काम आले.

गरांडा केंद्राहून रेड्डी सेवाग्रामाला परत आले. बारा-चौदा वर्षानंतर. पण सेवाग्राम बदलले होते. रेड्डी बाहेर पडले. ओरिसा-बंगाल-बनारस असे फिरत फिरत नुकतेच ते गोविंदपूरला येऊन पोचले होते.

आणि स्वामिजी गोविंदपूर सोडू पहात होते.

दहा वर्षांपुरते त्यांनी आपले हे कार्यक्षेत्र निवडलेले होते. नुकतेच ते भेटायला गेले तेव्हा विनोबांनी त्यांना या कालमर्यादेचे स्मरण करून दिले होते. यानंतर स्वामिजींनी दक्षिणेकडे कुठेतरी जावे असे विनोबांच्या मनात होते.

दहा वर्षांपूर्वी या कार्यक्षेत्राकडे जाताना विनोबांनी स्वामिजींना सांगितले होते : जातो आहेस. पण एक लक्षात ठेव. उत्तर प्रदेश हा पुढाऱ्यांचा प्रदेश आहे. विधायक कार्यकत्र्याला या प्रदेशात फारसा वाव मिळत नाही.

स्वामिजींनी हे आव्हान स्वीकारले. कारण केवळ विधायक कार्यकर्ता म्हणून सेवेची कामे करीत रहाणे एवढेच त्यांचे उद्दिष्ट नव्हते. सर्वोदयाला नसलेली राजनीतीची धार त्यांना प्राप्त करून द्यायची होती. यासाठी त्यांनी केवळ अध्यात्मात रमलेल्या हरिद्वारच्या स्वर्गाश्रमाचा त्याग करून अध्यात्म आणि राजकारण यांची यशस्वी सांगड जेथे घातली गेली त्या सेवाग्रामला पंचवीस वर्षांपूर्वी धाव घेतलेली होती. पण गांधीजी त्यानंतर एक-दोन वर्षातच गेले. नेहरूंनी फक्त सत्ता-राजकारण पाहिले. विनोबा अध्यात्मातून, भदानामुळे थोडे बाहेर पडल्यासारखे वाटले; पण ही प्रत्यक्ष

। १६६ ।