पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/170

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तेहतीस टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेला हा जिल्हा. सभेला मुस्लिम स्त्री-पुरुष श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित. पण कुटुंब नियोजनाविषयीसुद्धा पंतप्रधान एक शब्द बोलल्या नाहीत. मग बुरखा टाकून द्या, अनेक-पत्नीत्वाला विरोध करा, तुर्कस्थानच्या महिलांप्रमाणे आधुनिकतेचा, कष्टपूर्वक का असेना, स्वीकार करा असे आवाहन स्त्रियांना उद्देशून करणे तर दूरच राहिले ! मुल्ला, मौलवी, धर्मगुरू पंडित यांच्या जुनाट संस्कारातून मुस्लिम समाजाने मुक्त व्हावे असा आवाज बाईंनी एकदाही का नाही उठवू ? येताजाता आगपाखड काय ती जनसंघावर. याने फार तर मतांचे गठ्ठे पक्के बांधले गेले. प्रश्न सुटला काय ? उलट या मुस्लिम अनुनयामुळे बहुसंख्य हिंदू समाज काँग्रेसला दुरावेल व जनसंघासारख्या धोकादायक जातीय पक्षांना अधिकच प्रोत्साहन मिळत राहिल...

संपादकमित्रा ! थोडे वेगळे मत येथे नोंदवून ठेवतो. तू नाहीस; पण तुझी अनुमती गृहीत धरतो.

तू गेली दहा वर्षे उत्तर प्रदेशात वास्तव्य करून होतास. एवढा इतिहास धांडोळलास. चालू काळाकडे इतक्या अभ्यासपूर्ण व चिकित्सक नजरेने पाहिलेस. असे नाही का तू ध्यानात घेतलेस की, (१) उत्तर प्रदेशचे राजकारण हे हिंदू-मुस्लिम तडजोडवादाचे राजकारण असते आणि (२) उत्तर प्रदेशचे राजकारण हेच हिंदुस्थानचे राजकारण ठरते ?

अगदी इतिहासकाळापासून हे चालत आलेले आहे. आम्ही मराठे, हिंदवी स्वराज्य संस्थापकाचे वंशज. पण नर्मदा ओलांडताना मराठी समशेरीला इस्लामच्या कडव्या प्रतिकाराची जी धार होती ती चंबळ ओलांडल्यावर थोडी कमीच झाली. आणि यमुनेच्या तीरावर जेव्हा आमची सैन्ये विसावली तेव्हा तर ' पातशाही कायम राखून राज्यविस्तार करणे.' हे मराठ्यांचे धोरण पक्केच ठरून गेले–महादजी शिंद्यांनी जे पुढे अंतापर्यंत चालविले. तूच जुना इतिहास सांगितला आहेस, की मराठ्यांनी पानपतचा सूड उगविण्यासाठी, या भीषण नाट्याचा मूळ खलनायक नजिबखान रोहिला याची बिजनौरजवळच असलेली कबरदेखील खणून काढली, उध्वस्त केली. तूच मग विचार कर की, संधी अनेकदा आली असताना देखील, मराठ्यांनी पातशहाचे सिंहासनच कधी का उखडून टाकले नाही ? यमुनाकाठच्या त्या सूरजमल जाठाचा कानमंत्रच याला कारणीभूत होता ना की, येथल्या प्रजेला दुखवू नका -आहिस्ता-आहिस्ता ! हाच कानमंत्र पुढच्या सर्व यशस्वी राजकारणनिपुणांनी ऐकला, त्याप्रमाणे आपली धोरणे त्यांनी आखली, त्यांना आखावी लागली, यात चूक कुणाची ? परिस्थितीची की व्यक्तीची ? गणपती उत्सवात दंगल माजल्याबद्दल येवल्याच्या मुसलमानांची कडक हजेरी घेणारे टिळक लखनौला पोचल्यावर देवाण-घेवाणीचा करार करण्यास प्रवृत्त का व्हावेत ? नेहरूंचे आणखी एक पाऊल

। १६३ ।