पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/169

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सब्दलला एक सहकारी मिळाला. मोदीनगरच्या कापड गिरणी कामगार संघटनेत काही काळ काम केलेल्या एका अर्ध्यामुर्ध्या कम्युनिस्ट कार्यकर्त्याचा हा मुलगा नझाकत हुसेन. वडिलांनी याला मुलांच्या पाठशाळेत न पाठविता सरळ इंग्रजी शिक्षणाकडे वळविल्यामुळे हा इतरांपेक्षा एकदम वेगळा वाढला. त्याने केंद्राला हवी होती ती माहिती झटपट गोळा करून दिली. काही मोहल्ले त्यालाही बंद होते. पण अशा ठिकाणी या दोघांनी मिळून एक वेगळीच शक्कल लढविली. भंगीकाम करणाच्या बायकांशी यांनी संधान जुळविले. या बायका संडास सफाईसाठी मुस्लिम घराघरातून जात होत्याच. त्यांनी केंद्राला हवी होती ती हातमाग वगैरेंची माहिती तर आणलीच. शिवाय नको त्या बातम्याही त्या पुरवू लागल्या-कोणा बाईला किती दिवस गेलेले आहेत, कोण मुस्लिम कुमारिका गर्भपाताच्या जाम खटपटीत आहे...

सब्दलचे काम आटोपल्यावर तो परत गेला. नझाकतला केंद्रातच अर्धवेळ कार्यकर्ता म्हणून घेतले गेले. इथे तो टायपिंग शिकला. त्याचे इंग्रजी खूप सुधारले. या भांडवलावर पुढे त्याने, मिरतला, नोकरी करीत करीत आपले एम् ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

एकीकडे मुस्लिम धर्मांधतेचा हा दैनंदिन अनुभव.

देशभर काँग्रेसने याच सुमारास चालवलेले मुस्लिम लीगचे पुनरुज्जीवन.

संपादकाने या भस्मासुराकडे डोळे वटारून पाहिले.

या अपवित्र युतीवर लेखणीचे प्रहार सुरू केले.

मुस्लिम समाजातील धर्मवेडाला खतपाणी घालण्याचे खिलाफती राजकारण खेळल्याबद्दल थेट म. गांधींनाही धारेवर धरले गेले.

पं. नेहरू तर संपादकाच्या दृष्टीने केवळ एक सत्तालोभी राजकारणी पुरुष होते. एखाद्या तत्त्वासाठी, अप्रियता पत्करून कडवी झुंज घेणे, सत्तेवर तिलांजली ठेवायलाही प्रसंगी सिद्ध होणे, हे नेहरूंच्या राजनीतीत बसूच शकत नव्हते. ते मुस्लिम समाजातील धर्माध-असहिष्णू प्रवृतींशी कशी काय टक्कर घेऊ शकणार ? नतर आली नई रोशनी ! बापसेही बेटी सवाई !

मुस्लिम प्रतिगामित्वाशी तडजोड करण्यात मुलगी वडिलांच्याही पुढे गेली. नेहरूंनी लीगशी राजकीय पातळीवरून तरी थोडाफार सामना दिला. इंदिरेने तर सत्ता संपादनासाठी लीगशी चक्क हातमिळवणीच करून टाकली.

बिजनौर, दिनांक ३ फेब्रुवारी १९७० : पंतप्रधानांचा निवडणूक दौ-यातील एक मुक्काम. प्रचारसभा. संपादक सभा ऐकतो, अंकात लिहितो−

। १६२ ।