पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/166

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जातीपोटजातीचे किडे मुस्लिम समाजातही वळवळत असल्याने तेली व धोबी मुसलमानांसाठी प्रत्येकी एकेक मशीद गावात वेगळी आहेच. तेली मुसलमान कुटुंबे फक्त ३२, लोकसंख्या १५०. धोबी मुसलमान कुटुंबे फक्त २३, लोकसंख्या ९५.

गावातील मुसलमानांचे नेतृत्व सहाजिकच एका विणकराकडे आहे. या विणकराचा बाप एका ब्रिटिश अधिकाऱ्याकडे खानसामा म्हणून नोकरीला होता. त्यामुळे तुटक्या फुटक्या इंग्रजीचा याला गंध आहे व त्या जोरावर तो आपले पुढारीपणाचे वजन टिकवून आहे.

गावातील एकही मुसलमान कधी राष्ट्रीय चळवळीत सहभागी झालेला नाही ब्राह्मण जमीनदारांचे पूर्वी गावावर वर्चस्व असल्याने बहुतेकदा तो काँग्रेस विरोधात जमीनदारांच्या बाजूने उभा राहिला. जमीनदारांचे दडपण नव्हते तेव्हा मात्र मुस्लिम लीगकडे तो ओढला जात होता.

फाळणीच्या काळात उत्तर प्रदेशचा हा भाग जातीय दंगलीच्या वावटळीत सापडला नाही किंवा लोकांनी स्थलांतरेही केली नाहीत. बोटावर मोजावे इतकेच उत्साही पीर पाकिस्तानकडे निघून गेले. बहुतेक इथेच राहिले. इतकेच नव्हे, देशाच्या इतर भागात कामधंद्यानिमित्त विखुरलेले खारीचे अनेक मुसलमानही त्या काळात सुरक्षिततेसाठी खारीतच येऊन राहिलेले होते. पंजाबमधील शहरातून असलेल्या खारीकर मुसलमानांची मात्र धडगत राहिली नाही. एक तर ते मारले गेले किंवा सरहद्दीपलीकडे त्यांना फेकून देण्यात आले. परंतु जे पाकिस्तानात तेव्हा स्वखुशीने गेले किंवा बळजबरीने ढकलले गेले त्यांपैकी बऱ्याचजणांचे खारीत येणे-जाणे, मुक्त परवानापद्धतीमुळे, चालूच राहिले.

गावात हाजला जाऊन आलेले ५० यात्रिक आहेत. बहुतेक सर्व विणकरच. 'हाजीजी' असे यांना बहुमानाने इतर धर्मबांधवांकडून संबोधले जाते. असे संबोधले नाही तर या सभ्य गृहस्थांना तो आपला अपमान वाटतो. हाजला जाताना-येताना हे सभ्य हस्थ चोरट्या मालाची ने-आण करीत असतात ही गोष्ट वेगळी !

जमीनदारी निर्मूलन कायद्यापूर्वी मुस्लिम समाज रहात असलेल्या जमिनीची मालकी सहा हिंदू जमीनदारांकडे होती. यापैकी तीन खारीत राहणारे होते व तीन बिजनौरचे. कायदा झाल्यावर या जमिनींची मालकी ओघानेच मुसलमान घरमालकांकडे आली.

खारी गावात एकूण शेतजमीन १२२३ एकर. यापैकी १२५ एकर जमीन जमीनपारी नाहिशी झाल्यावर विणकर कुळांकडे आली. तेली, धुनस व धोबी जातीतील 3ळांना अनुक्रमे १४, ४८ व ५६ एकर जमीन मिळाली.

। १५९ ।