पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/165

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होता. विषयावरून विषय निघाला तेव्हा याने हा प्रसंग सहज सांगून टाकला. बाबुसिंह चौहान यांना (संपादक, बिजनौर टाईम्स) त्यावेळी झालेले संभाषण आठवते ते साधारणतः असे-

‘बाबुसिंह ! सध्या तुम्हा मंडळींचे आमच्याकडे मुळीच लक्ष दिसत नाही. अहो ! परवा आम्ही मरता मरता वाचलो !'

'अं ! काय झाले काय !'

‘चांगले आठ-दहा लोक आले होते. ती आमची हरिजन मंदिर प्रवेशाची भानगड! पण एकटा पुरून उरलो सगळ्यांना. ठोकून काढले एकेकाला. शेवटी पळून गेले लेकाचे.'

'अहो मग काही फिर्याद बिर्याद ?'
'समजेल त्यांना आपली चूक, आज नाही उद्या. मामला किरकोळ, म्हणून सोडून दिला.'

मंदिराप्रमाणे संपादक मशिदींकडेही वळला.

विणकर, तेली, घुमार, धोबी, धुनस, फकीर, नैस, सक्का व मणिहार-सुमारे तेविसशे लोकवस्तीच्या खारी गावातील चौदाशे मुसलमानातील या नऊ पोटजाती. एकट्या विणकरांची संख्या सुमारे एक हजार. म्हणून या समाजाचा अभ्यास अधिक बारकाईने करावा असे ठरले. अभ्यास सुरू झाला.

१९२८ पर्यंत हे विणकर आपापल्या मागांवर काम करून रीतसर मार्गाने पोट भरणारे साधेभोळे कारागीर होते. यानंतर रेल्वे या भागात आली व या विणकरांपैकी काही दूरदूरच्या अहमदाबाद-मुंबई शहरात किंवा जवळच्या लुधियानात कामधंद्यासाठी जाऊ लागले. कुणी विणकर म्हणून, कुणी पावांच्या भट्टयांवर, कुणी गोऱ्या साहेबांचे पट्टेवाले-चपराशी म्हणून. यामुळे या समाजाच्या हातात नवा पैसा खेळू लागला. कच्च्या झोपड्या जाऊन पक्की घरे आली. खारी गावातील एकूण पक्क्या घरांच्या संख्येपैकी पंचाहत्तर टक्के पक्की घरे या विणकर समाजाची आहेत.

घरे सुधारली, पण शिक्षणात सुधारणा नाही. उलट धर्मवेडेपणा वाढला, धार्मिक भावना अधिक नाजूक बनल्या. काही चलाख मंडळी परगावी हिडन येथील मशिदीसाठी देणग्याही गोळा करून आणू लागली. परिणामतः लहानशा जागेत केवळ हजार एक विणकर मुसलमानांसाठी दोन मशिदी व एक अरेबिक पाठशाळा येथे आहे.

। १५८ ।