पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/160

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गिक समृद्धी असो. साम्यवादी संस्कृती त्याला यापेक्षा अधिक जवळची वाटत असावी. सभोवतालच्या भ्रष्टाचाराला, अंदाधुंदीला कंटाळून, वैतागून कधीकधी तो हुकुमशाहीची स्वप्नेही रंगवीत असे. ही हुकुमशाही अर्थातच उजवी नसे. कारण हिटलर, त्याचा वंशवाद, नाझींचे अत्याचार याविषयी त्याने फार तुच्छतेने लिहिलेले आहे. पण आपल्याकडील राजकीय पंडितांची, पक्षनेत्यांची ठोकळेबाज डावीउजवी वर्गीकरणेही त्याला मान्य होत नव्हती. जातींचे प्राबल्य, जमातवादी राजकारण यामुळे या सरधोपट वर्गीकरणाला अनेक छेद जातात, ध्रुवीकरण स्पष्ट होत नाही, डावे-उजवे यांची सतत सरमिसळ होत रहाते असा काहीसा याचा विचार असावा. उत्तर प्रदेशातील आयाराम-गयारामांचा गोंधळ पाहून एकदा याने चिडून लिहिले होते की, सर्व राजकीय पक्षांच्या कचेन्यांना कुलपे ठोका. उत्तर प्रदेशातील सर्व सामाजिक-सांस्कृतिक संघटनांच्या कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन सत्ता राबवा. या संघटनांच्या यादीतून त्याने रा. स्व. संघालाही वगळलेले नव्हते.

भा. क्रां. द. बाबत याचा असाच वेगळा दृष्टिकोन. उत्तर प्रदेशातील काँग्रेस समाजवादाचे नाव घेत असली तरी प्रत्यक्षात खेड्यातील जुनाट जमीनदार वर्गाची व शहरातील व्यापारी कारखानदारांची तिच्यावर पूर्ण पकड आहे. जमातवादी मुस्लिम संघटना आपले फुटीरतेचे, संकुचित राजकारण काँग्रेसच्या आधारानेच खेळत रहातात. याउलट चरणसिंगांच्या रूपाने हरितक्रांतीतून जन्मास आलेले नवे शेतकरी नेतृत्व पुढे येत आहे. तुलनेने ते पुरोगामी आहे. उत्तर प्रदेशातील काँग्रेसी सत्तेची मक्तेदारी मोडायची, तर या उदयोन्मुख शक्तीला पाठिंबा दिला पाहिजे - अशी याची भूमिका होती व यासाठीच पहिल्या मध्यावधी निवडणुकात याने भा. क्रां. द. कडे आपल्या अंकातून थोडे अधिक सहानुभूतीने पाहिले होते. उत्तर प्रदेशचे पश्चिमेकडील काही जिल्हे हे भा. क्रां. द. चे किल्ले. जाठांची बहुसंख्या असलेला हा भाग. सत्तावनच्या उठावणीतील पहिली गोळी या विभागातील मिरत शहरात मंगल पांडे याने उडविली. या इतिहासाचा संदर्भ देऊन संपादक एका अंकात भाकित करतो : चरणसिंगही याच विभागातून पुढे येत आहेत. गेल्या शंभरदीडशे वर्षात शेतीचे शोषण करणाऱ्या वर्गाच्या हातात सतत सत्ता राहिली आहे. पूर्वी सत्ताधारी परकीय होते. स्वातंत्र्यानंतर ते स्वकीय झाले एवढाच फरक. या सत्ताधाऱ्यांना उचलून फेकून दिल्याशिवाय शेतीचे, ग्रामीण जनतेचे, भारताचे पुनरुत्थान होणार नाही. केव्हातरी कसणारा, श्रम करणारा किसान विरुद्ध त्याच्या श्रमावर जगणारे इतर सर्व असा सामना येथे खडा रहाणार आहे. जागृत होणाऱ्या किसानशक्तीचे चरणसिंग हे एक प्रतीक आहे. मंगल पांडे जसा स्वातंत्र्य युद्धातला पहिला मानकरी ठरला तसा, कोण जाणे, उद्या अटळपणे होणाऱ्या किसानक्रांती युद्धातला एक आघाडीचा मानकरी ठरण्याचा योग चरणसिंगांच्या बाबतीत घडूनही येईल!

। १५३ ।