पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होता. आपण सहा महिने राहिलो तो स्वर्गाश्रम त्यावेळी कसा शांत--निवांत होता! आता काळ्या पैशातून येथे कशा टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत! गंगाकाठाचे रम्य तपोवन जाऊन नदीकाठची उतारवयस्कांची ही वसतीस्थाने होऊ लागली आहेत-संपादक या स्थित्यंतरामुळे फार व्यथित आहे.

सध्या महेश योगी यांची चलती आहे.

संपादक डिव्हाईन लाईफ सोसायटीच्याआवारात प्रवेश करतो. गांधी जन्म शताब्दीदोन ऑक्टोबरचा तो दिवस. हरिजन कुटुंबांच्या सत्काराचा खास कार्यक्रम आयोजित केलेला असतो. सत्कार म्हणजे केवळ मिठाईचे वाटप! हारतुरे नाहीत. पंचारती, धूपदीप, घंटानाद सगळे नाटक उभे केले गेले होते. कॅमेरे सज्ज होते. वेगवेगळ्या कोनातून टिपलेली दृश्य आता मासिकाद्वारे जगभर पोचवली जाणार होती. भारतात हरिजनांना केवढी सन्मानाची वागणूक दिली जाते याचा हा केवढा चोख, रंगीत--संगीत पुरावा ! गांधीजींचा भारत ! आध्यात्मिक भारत ! तुफान प्रसिद्धी. साधकांच्या नव्या झुंडी. संपादक लेखणी खुपसतो : ' ही जाहीरातबाजी कशासाठी ? आश्रमात यांना कायमचे काम द्या. विशेषतः स्वयंपाक घरातले. एक तरी साजुक-सोवळा साधक येथे टिकून रहातो का ते पहा; It was vanity writ large on the walls of the Divine Life Society. दिव्य जीवन संस्था -एक प्रचंड पोकळ ढोंग.'

बिजनौर जिल्ह्याचा इतिहास अंकामागून अंकात सादर होत होता. कुठून कुठून संपादकाने माहिती जमा केलेली होती. जनगणनेचे अहवाल, डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स, ऐतिहासिक दफ्तरे, पुराणकथा, दंतकथा सगळ्यांचा आधार घेतला गेला होता. महाभारत काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंत इतिहासाचा धागा आणून पोचवला होता. ऋषीमुनींच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी. शिष्टाई असफल झाल्यावर दुर्योधनाचे प्रासादीय आगतस्वागत नाकारून कृष्ण भगवान तडक विदुराघरी आले. कण्या खाऊन त्यांनी ती रात्र मित्रासमवेत संभाषणसुखात घालवली-ती विदुरकुटी येथून जवळच पाच-सहा मैलावर यात्रेचे ठिकाण म्हणून आजही प्रसिद्ध आहे. कण्वाने शकुंतलेचे लालन-पालन या परिसरातच केले. शुकमुनींची तपोभूमी हीचयासाठी तर हा संन्यस्त संपादक उभ्या भारताची परिक्रमा करून शेवटी येथे स्थिरावला नसेल ? ऋषी आणि कृषी-आज तुटलेला हा संबंध त्याला पुन्हा जोडायचा होता. ही जोड जेव्हा जेव्हा जमली तेव्हा भारत वैभवात नांदला असा त्याचा अभ्यासांती निश्चित झालेला विचार होता. या विचारालाच कृतीचे रूप देण्याचा गोविंदपूरचा आश्रम हा एक प्रयत्न होता. पाश्चात्यांकडून आपण उचललेल्या व्यापारी संस्कृतीच्या सर्व आविष्कारांचा त्याला उबग होता–तिटकारा वाटत होता. मग ती संसदीय लोकशाही असो की शहरातून फोफावणारी औद्यो

। १५२ ।