पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अत्याचाराची घटना घडल्यानंतर खारी गावातील हरिजन तक्रार गुदरण्यास शेजारच्या हल्दौर पोलीस ठाण्यावर गेले. ठाणेदाराने दुर्लक्ष केले. हरिजनांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन गावातील बहुसंख्य मुस्लिम समाजाकडून होणाऱ्या उपद्रवांची त्यांना जाणीव दिली. वरून हुकूम आल्यावरच हल्दौर ठाणे जागे झाले व तक्रार रीतसर नोंदवली गेली.

आरोपीने खटला चालविण्यासाठी चांगले वकील दिले. हरिजनांजवळ पैशाची कमतरता होती. तरी उदेकुमार नावाच्या वकिलाला त्यांनी शंभर रुपये जमवून दिले. पण या वकिलाने काहीच काम केले नाही. म्हणून चेतन स्वरूप नावाचा दुसरा वकील हरिजनांनी गाठला. त्याला दोनशे रुपये दक्षिणा म्हणून दिली. पण याही वकिलाने शेवटपर्यंत तोंड उघडले नाही. निकाल लागल्यावर या दोनशे रुपयांपैकी पन्नास रुपये हरिजनांना परत करण्याचे सौजन्य या चेतन स्वरुप महाशयांनी का दाखवावे हे मात्र एक गूढ आहे.

□ ३-९-१९६८ : जिल्हा कोर्टात, खारी गावातील गोहत्येसंबंधीचा खटला आज पुढे आला. कामकाज न होता पुढची तारीख पडली.

२४ एप्रिल १९६८- या दिवशी रात्री खारीतील हिंदूंना गावात मजीद या मुसलमानाच्या घरात गाय कापली जात असल्याचा संशय जाला. सात मैलावर असलेल्या हल्दौर पोलीस ठाण्याकडे हिंदू धावले. पोलीस चौकशीसाठी दाखल झाले तेव्हा मध्यरात्र उलटली होती. मजीद व त्याचा एक साथीदार पुराव्यानिशी सापडले. काही क्विटल गोमांस गाडीत भरून पोलीस ठाण्यावर नेले गेले असे कळते.

□३ सप्टेंबर १९६८ : करौंडीच्या पूरणसिंगांनी नलिका कूप खात्यातील एका कर्मचाऱ्याविरुद्ध नुकसानभरपाईसाठी गुदरलेल्या फिर्यादीची आज सुनावणी झाली या खात्यातील बरेच अधिकारी-कर्मचारी आज कोर्टात गोळा झालेले होते. आपल्या उसाला नियमाप्रमाणे पाणी देण्यास सदर कर्मचाऱ्याने नकार दिल्यामुळे आपले नुकसान झाले असा पूरणसिंगाचा दावा आहे. माझी साक्ष निघाली. तीन तास साक्षीचे काम चालू होते.

या प्रकरणाची फाईल नलिका कूप खात्याने दडवून ठेवली, कोटसमोर ये ऊच दिली नाही असे कळते.

अशा स्थानिक, किरकोळ नोंदी करता करता संपादकांची लेखणी मध्येच एकदम हरिद्वार-हृषीकेशला फेरफटका मारून येई. आपला पदव्युत्तर अभ्यासक्रम अर्धवट सोडून लाहोरहून संपादक सत्तावीस वर्षांपूर्वी येथे संन्यास घेण्यासाठी आलेला

। १५१ ।