Jump to content

पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
PERSONALITY
An English-cum-Hindi Rural Fortnightly.
News, Views and Research Journal

दिवसा जनसेवक. रात्री संपादक-मुद्रक-प्रकाशक-लेखक-विचारवंत-अभ्यासकसंशोधक-सब कुछ !

कुठून तरी एक सायक्लोस्टाइल मशीन याने पैदा केले. यावर आपला सर्व अंक लिहून, छापून तो दर पंधरा दिवसांनी हा प्रकाशित करीत असे.

बिजनौरला जिल्ह्याच्या ठिकाणी, निदान वस्ती असलेल्या जवळपासच्या एखाद्या खेड्यात पाक्षिकाचे कार्यालय ठेवा असे अनेकांनी सुचविले. पटले नाही. लेखणी आणि नांगर एकत्र जिथे मला नांदवता येतील तिथेच मी रहाणार, काम करणार, मग भले अंकाची शोभा थोडी कमी होवो, व्यवस्था सांभाळणे जिकिरीचे, त्रासाचे ठरो, हा याचा हट्ट.

पहिल्या अंकात संपादकाने आपले मनोगत व्यक्त केले आहे.

'येथे मी ‘व्यक्तित्व विकास केंद्र' सुरू करीत आहे. आपली माहिती थोडक्यात कळवा. निवड झाल्यावर आपण येथे कायम वास्तव्यासाठी येऊ शकता.

प्रत्यक्ष या जीवन विकासाच्या प्रयोगात आपण सहभागी होऊ शकत नसल्यास विविध प्रकारे आपण या प्रयोगाला हातभार लावू शकता.

आपल्या संग्रहातील निवडक चांगली पुस्तके पाठवा. येथे ग्रंथालयाची आवश्यकता आहे.

वीज लवकरच पोचेल. आपण सधन असाल, व्यवसाय-व्यापार यात आपली चांगली भरभराट असेल तर छापखान्यासाठी यंत्रसामग्री हवी आहे. यासाठी कर्जरूपाने काही रक्कम पाठवा. मुदत संपताच रक्कम सव्याज परत करण्याची मी हमी घेतो.

भ्रष्टाचार, लाचलुचपत, याविरूद्ध लोकमत जागृत करून चळवळ उभारणे हे या केंद्राचे एक वेगळेपण आहे. आपण सरकारी नोकरीत असाल तर यासंबंधी महत्त्वाची माहिती आम्हाला पुरवा. आपले नावगाव गुप्त ठेवण्याची सर्व खबरदारी आम्ही घेऊ. आपल्याला यामुळे कोणताही उपसर्ग पोचू देणार नाही. आपण स्वतःच बरबटलेले असाल, भ्रष्ट नोकरशाही, गोरगरिबांवर अन्याय करणारे बडे जमीनदार-सावकार, काळाबाजारवाले व्यापारी, कारखानदार यापैकी कुणाशी आपले लागेबांधे असतील तर आपल्याकडून माझी कसलीही अपेक्षा नाही. आपण लवकरच आपले मार्ग बदला एवढेच मी सुचवू इच्छितो. नाहीतर लोक आता आपल्याला गोळ्या घालून ठार मारल्याशिवाय राहाणार नाहीत.

। १४७।