पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एक संपादक येथे गोळ्या घालून निघृणपणे मारला गेला होता. एखादे जनावर कोंडून टिपावे तसा. असहाय्य, नि:शस्त्र, एकाकी; पाहुणा म्हणून काही दिवसांसाठी आलेल्या एका वृद्ध सहकाऱ्यासह.

दिवसा आसपासच्या गावातून काम करावे. गावकऱ्यात मिसळावे, त्यांच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करावा, माहिती जमवावी. अन्यायाविरुद्ध टकरा घ्याव्यात. लहानमोठ्या सरकारी अधिकाऱ्यांना सतत धारेवर धरावे. लाचखाऊ जाळ्यात पकडावेत. पोलीस अत्याचारांविरुद्ध रान उठवावे. बड्यांना फटकारावे. छोट्यांना, अन्यायपीडितांना धीर देऊन शक्ती एकवटून त्यांच्यासाठी झुंजावे.

दिवसा सायकलवरुन किंवा पायी ही सारी वणवण करावी. रात्री माळावरच्या झोपडीत, एकांतात, अंधारात अदृश्य व्हावे. जवळची मनुष्यवस्ती म्हटली तरी दोन फर्लागापुढची. हाकेच्या अंतरावर कुणीही नाही.

असा हा एक निःसंग. निःस्पृह. कुणाचा मिंधा नाही, कुणाचा बंदा नाही. एकटा मोकळा, निर्भय, स्वतंत्र.

 बहु जनी असो नये । बहु आरण्य सेवू नये ।
 बहु देह पाळू नये । आत्महत्या खोटी ।। ।

मूळ हा पंजाबचा. मोगा-फिरोजपूर भागातला. घरदार सोडून तरुणपणीच बाहेर, पडलेला. गंगाकिनारी याने संन्यासदीक्षा घेतली आणि याचे भारत भ्रमण सुरू झाले. हा महाराष्ट्रात, पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत होता. गाडगिळांची यावर मर्जी होती. हा आंध्रात विनोबांबरोबर पदयात्रिक म्हणून हिडला. हा ओरिसात, कोरापुट जिल्ह्यात ग्रामदान-नवनिर्माण कार्यासाठी राहिला. केरळवर तर याने पुस्तकच लिहिले आहे- Sarvodaya in a Communist state. नंबुद्रीपादांचे पहिले सरकार असताना हा वर्षभर तेथे अभ्यासासाठी वास्तव्य करून होता. पूर्ववयात पंजाबमध्ये किसानसभेचा एक जहाल कार्यकर्ता म्हणून हा वावरला. काही काळ कम्यनिस्ट पक्षाचा क्रियाशील सदस्यही होता म्हणतात. कुठेच थांबला नाही, टिकला नाही, रुजला नाही. अस्वस्थ, अशांत. क्रांतीची रणक्षेत्रे सतत शोधीत होता. बिजनौरजवळच्या आश्रमात जेव्हा तो स्थिरावला तेव्हा ' विनोबा' हे त्याचे दैवत होते. येथूनच तो सर्वोदय आणि राजकारण यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करीत होता. सर्वोदयी क्रांतीची एक आघाडी झुंजवीत होता.

यासाठी प्रत्यक्ष कार्याच्या जोडीला त्याने एक पाक्षिक सुरू केले-

। १४६ ।