पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेतकऱ्यांच्या चंद्रमौळी झोपड्या उभ्या असलेल्या दिसतील. त्यांच्याच चार-सहा आण्यांच्या मिळकतीतून हे महाल उभारले जातात. आणि गलेलठ्ठ पगार दिले जातात....'

पंडितजी ! आपण स्वप्न तर फार मोठे पाहिले. पण प्रत्यक्ष दिल्ली जेव्हा आपल्या ताब्यात आली तेव्हा हे महाल अधिकच उंच उंच होत गेले. त्या चंद्रमौळी झोपड्याची संख्या अफाट वाढली. ब्रिटिश शोषक गेले. पण त्यांची जागा नव्या शोषकांनी घेतली. आपल्याला प्रिय असणारी ध्येये हे नवे शोषक कधीच वास्तवात आणू देणार नाहीत. आपण ज्या स्वातंत्र्यसंग्रामात लढलात आणि अखेरीस विजयी झालात तो स्वातंत्र्यसंग्राम म्हणूनच अपूर्ण राहिलेला आहे. सत्तांतर झाले; पण स्वातंत्र्याचा प्रकाश त्या चंद्रमौळी झोपडीपर्यंत अद्यापही पोचलेला नाही. आपल्याला आणि आपल्यासारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांना, पूर्वसुरींना स्मरून, म्हणूनच पुन्हा नव्या स्वातंत्र्यसंग्रामाची तयारी भारतीय जनतेला केली पाहिजे, नवा व्यूह रचला पाहिजे. पहिले स्वातंत्र्ययुद्ध विदेशी शोषकांविरूद्ध होते. आता शोषक स्वदेशी आहेत. म्हणूनच ही लढाई जास्त अवघड आहे. रामरावण युद्धापेक्षा कौरव-पांडवांचे भ्रातृयुद्ध अधिक क्लेशदायक व धर्मसंकटात टाकणारे होते. कोण श्रीकृष्ण आता गीता सांगण्यासाठी उभा राहतो ते पहायचे. युद्ध तर अटळच आहे आणि चिखला-मातीत बुडालेल्या खोपटातील करोडो भूमिपुत्रांनी आपल्या लंगोट्यांचे ध्वज त्या अस्मानभेदी महालांच्या शिखरांवर फडकविल्याशिवाय या युद्धाचा शेवट होण्यासारखा नाही. भारत तोवर ऋणमुक्तही होणार नाही. समोर फेसाळणारा अथांग सिंधुसागर तोवर भारत विजयाची स्तोत्रे मुक्त स्वरात गाऊ शकणार नाही. ती हिमालयातील शुभ्र शिखरे बर्फाचे तट म्हणूनही तोवर अभेद्य रहाणार नाहीत. तो हिंदुकूश पर्वत भारताचे निशाण डौलाने फडकविण्याचे तोवर नाकारीतच राहील ! हिंदुस्थानच्या या विजयोत्सवासाठी, भूमिपुत्रांनो आणि सिंधूपुत्रांनोही ! सर्वांना आता एक झाले पाहिजे. कारण विजय अखेर याच शक्तीचा व्हायला हवा. लक्ष्मीपुत्रांचा नाही. या शक्ती विजयी झाल्या तरच लक्ष्मी लक्ष्मीच्या ठिकाणी नांदेल, भारत भारत ठरेल. जगातील संस्कृतींच्या सरित्संगमावर आपलाही एक सुंदरसा भव्य घाट बांधू शकेल. केवळ प्रगत भारत नको. व्यक्तित्वसंपन्न भारत हवा आहे. आणि यासाठी एका नव्या मुक्तिसंग्रामाची उभारणी होणेही अवश्य आहे.


*


सप्टेंबर १९७१

। १४३ ।