पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेवटी मुक्तिसंग्राम म्हणजे तरी काय ?...

‘तुझे आहे तुजपाशी' हे ओळखणे. मागासलेला म्हणून जरी सर्वत्र गाजावाजा झालेला हा देश असला तरी नैसगिक व मानवनिर्मित साधनसंपत्तीत तसा हा काही कमी नाही. याने हीनदीन व लाचार बनावे अशी तर मुळीच परिस्थिती नाही. ‘योजकस्तत्र दुर्लभः' अशी खरी अडचण आहे. योजना चांगल्या असल्या तरी त्या राबवणाऱ्या, संघटित करणाऱ्या कार्यकर्त्यांची मुख्य उणीव आहे. दोनचार बसगाड्या जाळल्या, एखाद्या इमारतीची तावदाने फोडली की आम्ही आमच्या तरुणपिढीवर ताबडतोब आगपाखड करतो. पण यापेक्षा कोटीपटींनी जे राष्ट्रीय संपत्तीची लूट करीत आहेत, चैनबाजीत आणि उधळपट्टीत तिची धूळदाण उडवीत आहेत, त्यांच्या विरुद्ध मात्र ब्र उच्चारण्यापलीकडे आपण काही करीत नाही. श्रीकैलास ते सिंधुसागर हा अन्नस्वतंत्रतेचा मोर्चा निघाला त्याच सुमारास मुंबईलाही, राष्ट्रीय संपत्तीचा नाश होऊ नये यासाठी काही थोर थोर मंडळींनी एक मोर्चा आयोजित केलेला होता. या मोर्चात काही साहित्यिक होते, विद्यापीठाचे उपकुलगुरू होते, बडे बडे समाजवादी नेतेही होते. मग एखादा मोर्चा त्या सटोडियांच्या, काळाबाजारवाल्यांच्या, राष्ट्रीय संपत्ती हडपगडप करणाऱ्या देशशत्रूच्या फोर्टातल्या उंच उंच वातानुकूलित इमारतींवर का नेला जाऊ नये ? तळाशी गाडल्या गेलेल्या त्या भूमिहीन आदिवासींचे, गरीब शेतमजुरांचे, छोटया किसानांचे रक्त शेवटी या इमारतींत गोठवले गेलेले आहे. इथून ते अशाच परदेशातल्या उंच उंच इमारतींकडे पाठविले जात असते. तिथून ते पुढे चंद्रावर पोचते. गरीब अप्रगत देशातील तो तळाचा श्रमिक मात्र अधिकाधिक खोल खोल रुतत जातो. तो वर यायला हवा असेल तर या गगनचुंबित इमारतींमध्ये दडलेला काळा पैसा बाहेर खेचला गेला पाहिजे, मोकळा करून त्याचे पाट दशदिशांना खेडोपाडी वहावले पाहिजेत. पस्तीस वर्षांपूर्वी, १९३६ च्या फैजपूर काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून पंडित नेहरूंनी हे स्वप्न पाहिलेले होते. त्यावेळी ते म्हणाले होते : 'ही ध्येये आमच्यासमोर असली तरी डोळ्यांसमोर दिसणारी परिस्थिती आणि हरघडी आमच्यापुढे येणाऱ्या अडचणी ह्यांना डावलून चालावयाचे नाही. लक्षावधी लोकांची उपासमार आणि बेकारी असे या परिस्थितीचे वर्णन करता येईल. तिच्या तावडीत मध्यमवर्गसुद्धा सापडलेला आहे. ही भीषण परिस्थिती वणव्यासारखी फैलावत चाललली दिसते. अनेक दुःखदायक विरोधांनी हे जग भरलेले आहे. पण हिंदुस्थानात आश्चर्यमूढ करून सोडणारे जे विरोध आढळतात तसे इतरत्र सापडणार नाहीत. साम्राज्यशाही सत्तेच्या व्यक्त चिन्हांप्रमाणे हीन प्रवत्तीच्या द्योतक अशा कलेने नटलेली नवी दिल्ली पाहा ! तिच्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च झाला आहे; पण तेथून चार-दोन मैलांच्या आत हिंदुस्थानातील उपाशी

। १४२ ।