पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ही संस्था या भागात शिक्षणाचे व आर्थिक विकासाचे कार्य करीत आहे. या खटल्यात गोवला गेलेला नसला, तरी अनेकांचा ज्याच्यावर संशय आहे व जो खटल्यातील आरोपींना सर्व तऱ्हेची कायदेशीर मदत पोचविण्याची प्रथमपासून खटपट करीत आहे, तो या भागातील प्रख्यात सर्वोदयी कार्यकर्ता अंबरसिंग सुरतवंती हा संस्थेचाच एक सभासद व काही काळ पदाधिकारीही असल्यामुळे, सातपुडा सर्वोदय मंडळाने या शंभर आदिवासी आरोपींना न्यायाचे संरक्षण देण्याचे कार्य पत्करणे, यात गैर असे काहीच नाही. निधी किती लागेल हे आज सांगणे कठीण आहे. प्राथमिक अंदाज दहा हजार रुपयांचा आहे. यापैकी एक चतुर्थाश तरी हिस्सा मुंबईपुण्याने ताबडतोब जमवून द्यावा असे ठरले व त्याप्रमाणे अंबरसिंग किंवा सातपुडा सर्वोदय मंडळाचे कुणी कार्यकर्ते या भागात येतील तेव्हा त्यांच्या स्वाधीन हा हिस्सा करण्याची व्यवस्थाही पूर्ण झाली आहे.

अशाच प्रकारच्या खटल्यात अडकलेले माणूस साप्ताहिकाचे एक लेखक श्री. अनिल बर्वे यांच्या येरवडा तुरुंगातून आलेल्या एका पत्राचाही या संदर्भात विचार झाला. पत्रात अनिल बर्वे यांनी लिहिले आहे. केवळ राजकीय सूडबुद्धीने, आकसाने तसेच फार मोठी चेन सापडेल या अपेक्षेने मला या प्रकरणात गोवण्यात आले. माझ्या घरी काहीही मिळाले नाही वा माझेविरुद्ध काहीही पुरावा नाही; परंतु मी एकटा पडल्याने मी स्वतःला डिफेंड करू शकत नाही. मला लीगल ॲडव्हाईसची फार आवश्यकता आहे'... इत्यादी. सातपुड्यातील आदिवासींप्रमाणेच पुण्यातील एका संतप्त युवकाला देखील घटनेने दिलेले अधिकार उपभोगता आले पाहिजेत, न्यायाचे योग्य सरंक्षण त्याला लाभले पाहिजे अशी याबाबत ग्रामायन कार्यकर्त्यांची भूमिका आहे. अनिल बर्वे यांच्यासोबत अटक झालेले छापखान्याचे मालक श्री. पायगुडे यांनाही हीच भूमिका लागू आहे. आरोप सिद्ध होत असेल तर शिक्षा अवश्य असावी. पण आरोपींच्या असहाय्य अवस्थेचा गैरफायदा घेतला जाऊ नये. यासाठीही निधीचा प्रश्न आलाच. प्राथमिक अंदाज दीड-दोन हजार रुपयांचा आहे. ही जबाबदारी 'माणूस' ने आपल्या वाचकांच्या सहकार्याने पार पाडावी अशी अनेकांची अपेक्षा दिसली. त्याप्रमाणे ' अनिल बर्वे-पायगुडे न्याय संपादन सहाय्यता समिती ' या नावावर हा निधी 'माणूस' तर्फे जमा करण्याचे काम लवकरच सुरू होईल. अंदाजापेक्षा निधी जास्त जमा झाला तर खर्च वजा जाता उरलेली सर्व रक्कम म्हैसाळच्या' श्री विठ्ठल संयुक्त सहकारी शेती सोसायटी ली.' या संस्थेला मदत म्हणून पोचवली जाईल. यासंबंधीचा सर्व हिशोब 'माणूस' अंकातून एकदा प्रसिद्ध करण्यात येईल व प्रकरण 'समाप्त' म्हणून निकालात काढले जाईल. म्हैसाळ येथील हरिजनांनी चालविलेल्या श्रीविठ्ठल संस्थेची माहिती यापूर्वी माणूस अंकातून वाचकांपुढे आलेलीच आहे.

। १३९ ।