पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुनर्घटना करणे ओघानेच येते. जे करण्याचे आपण गेली पंचवीस वर्षे टाळीत आहोत तेच परिस्थितीच्या दबावामुळे करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. पैसा कमी पडल्यावर परदेशी पळता येणार नाही. स्वदेशातच पडलेला पैसा उकरून काढावा लागेल. सैन्य सीमारक्षणापुरतेच ठेवणे परवडू शकणार असल्याने देशांतर्गत अस्थिरता व असंतोष वाढू न देण्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. यासाठी ग्रामीण व शहरी भागातील सत्तेच्या व संपत्तीच्या न्याय्य वाटपाचा प्रश्न प्रथम धसास लावावा लागणार आहे. देश गरीब आहे तेव्हा समाजव्यवस्था पोखरलेली, विषमतेने ग्रासलेली आणि समतोल ढळलेली ठेवून प्रगती साधता येणार नाही, बलाढ्य राष्ट्रांच्या मालिकेत स्थान मिळणार नाही, हे आपण ओळखून, विरोधाची आणि विकासाची दोन्ही पाती सारखी धारदार ठेवली पाहिजेत. क्षुद्र भेदाभेदांना मूठमाती देऊन, क्षुल्लक मतभेद विसरून ही देशांतर्गत आघाडी मजबूत केल्याशिवाय नवस्वतंत्र देशांना पुढे येण्याचा पर्याय नसतो. हे पुढे येणे हाच मुक्ति संग्रामाचा दुसरा अर्थ आहे.

विधायक कार्य व राजकारण यांची आपल्याकडे एक चुकीची फारकत झालेली आहे. मुक्तिसंग्राम प्राथमिक अवस्थेत असल्याचे हे एक लक्षण आहे. पूर्वी टिळकयुगात अगोदर सामाजिक सुधारणा की राजकीय स्वातंत्र्य असा एक वाद होता. त्याचीच ही नवी आवृत्ती आहे. गांधीजींच्या काळात हा वाद मिटला व सामाजिक सुधारणा व राजकीय स्वातंत्र्य या दोन्ही आघाड्या एकमेकांना पूरक आहेत असा समन्वय साधला गेला. आजही विधायक कार्य व राजकारण यांचा सांधा असाच जुळून येणे अवश्य आहे. विधायक कार्यकर्ते राजकारणापासून दूर आहेत, तर राजकीय संघर्षवाल्यांना जनतेची आर्थिक व सांस्कृतिक पातळी उंचावण्याच्या कार्यक्रमात रस उरलेला नाही. ही फूट गरीब देशाला परवडण्यासारखी नाही. गरीब व मागासलेल्या देशात राजकारणाचे टोक एकच असू शकते. ते म्हणजे पुढारलेल्या राष्ट्रांचे वर्चस्व झुगारुन देणे. साम्राज्यशक्तींच्या जोखडातून नवस्वतंत्र स्वदेशाला मुक्त करणे. जागतिक सत्तावाटपातील आपला न्याय्य वाटा हस्तगत करणे; पण देशांतर्गत पुनर्घटनेशिवाय हे राजकरणाचे टोकही बोथट रहाते. विधायक कार्य या पुनर्घटना कार्यक्रमाचे एक अंग म्हणून यासाठी जोपासावे लागते. अगदी माओला सुद्धा येनानच्या कसोटीच्या काळात जनतेच्या हाती काही काळ चरखा द्यावा लागलेला होता, हे विधायक कार्याची टिंगल करणाऱ्या शूर ( ? ) क्रांतिकारकांनी विसरू नये. तळ म्हणून ही विधायक कार्याची क्षेत्रे उपयोगी पडतात. भावी पुनर्घटना कार्यक्रमाच्या प्रयोगशाळा म्हणूनही हे उपक्रम फार मौलिक ठरतात. नवा ध्येयवाद जनतेपर्यंत पोचविण्याचे, त्यागासाठी, कष्टासाठी तिला प्रवृत्त करण्याचे महत्कार्य या तळांच्याद्वारे साधता येते. राजकारणाला सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक पुनर्घटनेचा असा आशय आपण दिला पाहिजे व विधायक

। १३७ ।