लागतील. तर जागृतीचे प्रमाण कमी असलेल्या सातपुड्यातील भिल्ल-आदिवासींपुढे एखादा सामुदायिक शेतीचा, सहकारी संघटनेचा पर्याय ठेवणे अधिक श्रेयस्कर ठरेल. पर्याय असा हवा की जमिनींचे हस्तांतर थांबेल, नव्या तंत्राचा वापर करणे भूमिहीनांना शक्य होईल.
ग्रामदान पर्यायाचाही विचार या संदर्भात पुन्हा व्हायला हरकत नाही. ओरिसातील कोरापुट जिल्ह्याचा व इतर ठिकाणचा अनुभव फार वाईट आहे, हे गृहीत धरूनही असे म्हणता येईल, की या पर्यायात दडलेल्या नवनिर्माणाच्या शक्यता खूप आहेत. पर्यायी ग्रामसत्तांचे तळ या चळवळीतून उभे राहू शकतील, जर तिची मांडणी व हाताळणी व्यवस्थित झाली तर. यासाठी सरकारी कृपाछत्राचा मोह तिला प्रथम सोडावा लागेल. अध्यात्माचे फाजील महत्त्व कमी करावे लागेल. विचारांचेही संपूर्ण आधुनिकीकरण घडवावे लागेल. ग्रामस्वराज्याची स्थापना हे औद्योगिक साम्राज्यशाही व समाजवादी नोकरशाही या दोन्हींविरुद्ध पुकारलेले एक मुक्तियुद्धच ठरले पाहिजे. ग्रामदानी गावांच्या तळांवरून हे मुक्तियुद्ध खेळले गेले पाहिजे. कुठल्याही मुक्तियुद्धासाठी जी किंमत मोजावी लागते ती सर्व मोजण्याची तयारी ठेवली पाहिजे. औद्योगिक संस्कृतीपुढे पराभूत ठरलेल्या जुन्या ग्रामव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाचा दुबळा प्रयत्न, हे आजच्या गांधी-विनोबाप्रणीत ग्रामस्वराज्य विचारांचे स्वरूप आहे. हे बदलले पाहिजे. भांडवलशाही व समाजवादी संस्कृतींच्या यशापयशाचा संदर्भ या विचारांना जोडला पाहिजे. यंत्रयुगाला भिऊन पळायचेही नाही, त्याला डोक्यावर घेऊन नाचायचेही नाही. या युगावर स्वार व्हायचे आहे. असा आधुनिक आणि लढाऊ दृष्टिकोन असेल तरच नक्षलवादालामाओवादाला ग्रामदान-ग्रामस्वराज्यवाद हा पर्याय ठरू शकेल. नाहीतर त्याचे मरण अटळ आहे. कोरापुटला जे घडले, बिहारमध्ये जे घडले, तेच ठाणे-सातपुडा भागात पुन्हा घडेल, इतकेच. भीती अपयशाची नाही, अपयशापासून योग्य तो बोध न घेण्याच्या प्रवृत्तीची आहे. असा बोध घेऊन पुढे जायचे असेल तर सातपुडा-ठाणे भागातील भूमिहीन आदिवासींचा प्रश्न हाताळत असता, इतर अनेक पर्यायांप्रमाणेच ग्रामदानाचा एक पर्यायही अवश्य डोळ्यांसमोर ठेवला जावा. हा सर्वोत्तम पर्याय आहे; पण याची किंमतही जबरदस्त आहे, हे मात्र विसरले जाऊ नये.
सर्वोदयी ही जबरदस्त किंमत मोजण्यासाठी पुढे येतील किंवा न येतील. भारतीय जनतेला, ही किंमत आज नाही उद्या मोजल्याशिवाय, मिळालेले राजकीय स्वातंत्र्य उपभोगता येणार नाही, जागतिक पातळीवर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा वैशिष्ट्यपूर्ण टसा उमटविता येणारे नाही. एक दुय्यम दर्जाचे राष्ट्र म्हणून कुणा बड्याच्या मदतीवर व मेहेरबानीवर जगण्यावाचून गत्यंतर नाही, हे निर्विवाद आहे. बहुतेक नवस्वतंत्र राष्ट्रांना आपले व्यक्तिमत्त्व सिद्ध करण्यासाठी हा मुक्तिसंग्राम, हे दुसरे