पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/135

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तुम्ही सर्वांनी मिळून, मोठ्या संख्येने चळवळ सुरू करा. गावेच्या गावे उठली पाहिजेत. तर काही करणे शक्य होईल.' अरे गृहस्था, तू कोल्हापुरात बिंदुचौकात फार तर उभा रहाणार. गावेच्या गावे उठणार कशी ? जे कुणी उठले आहेत त्यांना मदत कर. आपोआप इतर मागे येतील. चळवळीवर लोकांचा विश्वास बसेल. पण हा मार्ग कष्टाचा, लांबचा, कंटाळवाणा. यात भपका नाही, नजरबंदी नाही, वर्षांनुवर्षे अज्ञातवासात राहून संघटना बांधण्याचे काम चालू ठेवावे, तेव्हा असे एखाददुसरे आंदोलन लढवता येण्याची शक्यता. गांधींनाही तीस वर्षांच्या कारकीर्दीत फक्त तीनच आंदोलने उभारता आली. २०, ३१ व ४२. दर दहा-बारा वर्षांनी एक. मधला काळ धीमेपणाने संघटना मजबूत करण्यासाठी-वाढविण्यासाठी, कार्यकर्ते तयार करण्यासाठी, दूरदूरवर ते पेरून ठेवण्यासाठी घालवावा लागला. कोण करतो ही दूरदृष्टीची बांधाबांध ? आले मनात, फंका रणशिंग. करा मुक्तीच्या घोषणा. लोकांच्या पदरात प्रत्यक्ष काही न का पडेना ! मला भेटलेले आजरे भागातील शेतकरी-शेतमजूर पार मोडून गेलेले होते. माफ्या वगैरे मागून तुरुंगातून सुटून आले होते. चळवळीचे पुन्हा नावही काढायला तयार नव्हते बिचारे.

गावपातळीवर, ज्यांना जमीन हवी आहे त्यांच्या संघटना तयार होणे यासाठी अवश्य आहे. कोणाकडे किती जमीन आहे, कोणाला जमिनीची खरी गरज आहे, वाटप कसे केले पाहिजे, याचे ज्ञान अशा गावसमित्यांना जेवढे असेल तेवढे दिल्लीमुंबईतल्या कुठल्याही पक्षाला, कुठल्याही सत्ताधाऱ्याला वा कोणत्याही श्रेणीच्या सरकारी अधिकाऱ्याला असणे शक्य नाही. ही बैठक जोवर तयार नाही, तोवर कायदा काहीही असो, कसेल त्याची जमीन या तत्त्वाचा अंमल होऊ शकणार नाही. ही मूळ बैठक तयार करण्याच्या कार्याकडे आमचे राजकीय पक्ष वळणार आहेत काय ?

'इथे थांबून चालणार नाही. एरवीची गोष्ट वेगळी असते. आता ७२ साल जवळ आलेले आहे. प्रत्यक्ष बदल घडलेला लोकांना दिसेल अशा दृष्टीने पुढची चळवळीची दिशा ठरवली पाहिजे-' जमीन कबजा आंदोलनात भाग घेतलेला एक संसोपा कार्यकर्ता मला सांगत होता. यवत येथील जमिनीवर सत्याग्रह केल्याबद्दल त्याला अटक झाली होती. सुटून आल्यावर मला सहज भेटला होता.

'म्हणजे नेमके काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते ?' मी.

'जिल्हा पातळीवर समिती स्थापन करून गावोगावी तिच्या शाखा काढल्या पाहिजेत. प्रत्येक गावच्या जमिनीचा प्रश्न वेगवेगळा असतो. कुठे जमीन पडीक राहिलेली असते. कुठे जादा जमीन बेकायदेशीररीत्या मालकांनी दाबून ठेवलेली असते. दोन्ही ठिकाणच्या उपाययोजनाही त्यामुळे वेगवेगळ्या असायला हव्यात. गावच्या परिस्थितीप्रमाणे वाटपाचा व त्यानंतर कसणुकीचा कार्यक्रम ठरवायला

। १२८ ।