पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निस्ट पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते. अलीकडेच त्यांनी पक्षकारण सोडून वकिलीचा व्यवसाय सुरू केलेला आहे.

‘एक एकर जरी जमीन यामुळे भूमिहीनाकडे येणार असेल तर आपला या चळवळीला पाठिंबा आहे; पण तसे होणार नाही. आमच्या आदिवासींनी तर गाजावाजा न करता कित्येक हजार एकर जमीन यापूर्वीच कबजा केली आहे. ते फार हुशार लोक आहेत.' घुमरे.

‘पण या चळवळीचा एक फायदा नक्की आहे. नवे नेतृत्व ग्रामीण भागात प्रवेश करू शकेल. आजची श्रीमंती शेतकऱ्याची पकड जरा ढिली होईल. असंतोष तर खूपच आहे. पण दडपण, दहशत यामुळे तो आजवर व्यक्त होऊ शकत नव्हता. विरोधी पक्षांनाही एक वाट मोकळी झालेली आहे,' देशदूत साप्ताहिकाचे संपादक श्री. शशिकांत टेंबे आपला विचार सांगत होते.

मग विषय निघाला काकासाहेब वाघ यांच्या वर्चस्व-क्षेत्रातील होणाऱ्या पण न झालेल्या सत्याग्रहासंबंधी. नाशिक जिल्ह्यातील आणखी एक संकल्पित सत्याग्रह होता दाभाडीचा. उजव्या कम्युनिस्ट पक्षातर्फे जाहीर झालेला. कुणालाच या दाभाडी सत्याग्रहाची नीटशी उपपत्ती लावता येईना.

नगर, नाशिक या जिल्ह्यातील कार्यकर्ते श्रीरामपूरला जमणार, खटोड, अण्णासाहेब शिंदे यांच्या जमिनीवर सत्याग्रहाचे निशाण रोवले जाणार असा कार्यक्रम उजव्या कम्युनिस्ट पक्षातर्फे 'युगांतर' मध्ये जाहीर झाला असताना नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा हा दाभाडी सत्याग्रहाचा सवता सुभा का असा मला प्रश्न पडला होता.

'स्थानिक राजकारण आहे हे' एकाने खुलासा केला. दाभाडी साखर कारखान्यातील एका गटाने प्रतिस्पर्धी गटाविरुद्ध डाव्या पक्षांना हाताशी धरून केलेली ही कारवाई आहे. शिवाय दाभाडीचा विजयसिंह ठाकूर म्हणजे अल्पसंख्य जमातीचा माणूस. त्यांच्या मदतीला, त्यांची बाजू घेऊन कोणी पुढे सरसावणार नाही हा आतला हिशोब. इकडे निफाड भागात, काकासाहेब वाघांनी दम भरला आणि सत्याग्रहच बारगळला.

'काय प्रकार आहे हा?' मी.

'अहो! काकासाहेब वाघांच्या क्षेत्रात सत्याग्रह होणार म्हणून अगोदर जाहीर झाल होते. काकासाहेबांचा खाक्याच और. 'याल तर झोडपून काढू' असाच त्यांनी पवित्रा घेतला. मंडळी गळाठली न् काय ! पंडीत धर्मा पाटील यांचा पवित्रा सौजन्यपूर्णतेचा. सत्याग्रहींना त्यांनी निरोप दिले, अवश्य या. जमीन देतो. काम देतो. तिकडेही कुणी फिरकले नाही. विजयसिंह ठाकूर बरा सापडला झोडपायला.' कुणीतरी उलगडा केला.

। १२५ ।