पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गरिबांकडे जिच्यामुळे गेली ती चळवळ स्वप्नाळू, भोळसट, भोंगळ आणि एक एकरही जमीन जिच्यामुळे प्रत्यक्षात अशी हस्तांतरित होणार नाही ते आंदोलन पुरोगामी, वास्तव आणि क्रांतिकारक ! दुनिया झुकती है, दुसरे काय?

दोन चार महिन्यांपूर्वी पेणहून पुण्याला येत होतो. वाटेत हेमडी हे गाव लागले. गावची सगळीच जमीन पूर्वी एका सावकाराकडे होती. अत्यंत खराब जमीन. ती त्याने भूदानात देऊन पुण्य मिळविले. ही खराब जमीन गावकऱ्यांनी हळूहळू लागवडीखाली आणली. गाव सारा कातकरी. उत्पादनाचे एकही साधन हाताशी नसलेला. आज, खराब प्रतीची का असेना, जमीन कसून त्यावर गुजराण करीत आहे कशीबशी. हे साधन हाताशी आले नसते तर होतेच मुंबईचे फुटपाथ आणि झोपडपट्टया यांच्यासाठी रिकाम्या!

विनोबा हे ओळखून आहेत. आजचे कायदे, वाटपातील अडचणी आणि पळवाटा वाटप करणाऱ्या यंत्रणेचे दोष-या सगळ्यातून हा माणूस गेलेला आहे. तरीही याने काही किमान भरीव यश मिळवून दाखविले. गावक-यांना एकत्रित आणून, त्यांच्या नैतिकतेला आवाहन करून. दोन पाय आणि चिंतनात गढलेले डोके एवढेच स्वतःजवळचे भांडवल. काही प्रामाणिक कार्यकर्त्यांची साथ.

या उलट कबजेवाल्यांची स्थिती. प्रचंड प्रसिद्धी, पक्षसंघटना, हजारो कार्यकर्ते, अनकूल लोकमत, सत्ताधा-यांपैकीच एका गटाचे आतून प्रोत्साहन, निवडणुकीचे प्रलोभन-तरीही फलनिष्पत्ती काय? मुठी जरूर उगारलेल्या. पण मुठीत काय? रिकामी रिकामी.

म्हणून विनोबा म्हणतात : बेटे हो! करून दाखवा, तर पाठिंबा. मी अहिंसेने थोडेफार केले. एकाकी होतो. तुम्ही सगळे मिळून, हिंसेने का होईना, काहीतरी करा तर खरे! जे मजबूत असेल, टिकून राहील!

भूमिक्रांतीच्या या आद्य प्रवर्तकाची या गदारोळात कुणालाही आठवण होऊ नये!

'सहज एकाला पाय लागला म्हणून माझे लक्ष गेले. जिल्ह्यातून आलेले बरेच आदिवासी घोळका करून एकत्र बसले होते. न्यायमूर्ती येण्याची वाट पहात होते. मग मी आणखी चौकशी केली. सर्व तयारीनिशी ही मंडळी गावाहून आलेली होती. दंड भरावा लागला तर कनवटीला नोटा गुंडाळून आणलेल्या होत्या. शिक्षा झाली तर आठ-पंधरा दिवस जेलमध्ये जाऊन येण्याचीही तयारी होती.' नाशिकचे घुमरेवकील मला सांगत होते.

जमीन बळकवा मोहिमेसंबंधी १५ ऑगस्टलाच आमचे बोलणे चालू होते. या मोहिमेला यांचा पाठिंबा असणारच असे मी गृहीत धरले होते. कारण एकेकाळचे ते कम्यु-

। १२४ ।