पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाटचालही यापेक्षा वेगळी नसते. 'पीसा' च्या मनोऱ्यावर गैलीलिओ चढला तेव्हाच युरोपात विज्ञानाचा उदय झाला. तोवर हजार-बाराशे वर्षे पढिक पांडित्य तेथेही ज्ञान म्हणून मिरवीतच होते. चार यंत्रे धडधडली, विज्ञानविषयक भाषांतरित पुस्तकांची रेचचेल माजली की, देशात शास्त्रीय प्रगतीचे युग अवतरले अशी आपली उथळ समजूत आहे. ही यंत्रे चालविणारे, भाषांतरे करणारे-वाचणारे मन शास्त्रीय दृष्ट्या अगदी आंधळे, सामाजिक दृष्ट्या अगदी जुनाटही असू शकते. नव्हे, आपल्याकडे ते बहुतांशी तसेच आहे. असंख्य भागवतांच्या अपयशातूनच वैज्ञानिक यशाची वाटचाल सिद्ध होत रहाते. एक नाही, चार कृषी विद्यापीठे जरी काढली तरी जोवर भागवतांसारखे कुणी अस्वस्थ होऊन विचार करणारे त्यातून बाहेर पडत नाहीत, त्यांची समाजाकडून बूज ठेवली जात नाही, त्यांच्यासारख्यांच्या प्रयत्नांचा पाठपुरावा करणारी संशोधकांची साखळी निर्माण होत नाही, तोवर ही बाहेरून आयात केलेली शास्त्रीयता, हे उसने विज्ञानप्रेम पोकळच आहे. प्रगत औद्योगिक देशांनी फेकलेली चार उष्टी शिते एवढीच याची मातब्बरी.

चार संशोधक -चार अधिकारी यांना काही दिवस वर किल्ल्यावर बंद करून ठेवले पाहिजे. या भागातील पाण्याच्या प्रश्नावर उपाययोजना शोधून काढल्याशिवाय त्यांची सुटका न केली पाहिजे-माझे मन या स्वप्नरंजनात सारखे दंग होत होते आणि वाटाड्या मात्र मला त्याच त्या जुन्या कथा, मला त्यातले काही माहीत नसावे या समजुतीने ऐकवीत होता. उदयभानूने देवलदेवी–कमलकुमारीला कसे अडकवून ठेवले होते, लग्नाची त्यांच्यावर कशी सक्ती केली जात होती, तान्हाजीला हे कसे कळले, वगैरे. मला मात्र आज या भागातील सर्वच गरीब रयतेला कुणीतरी अडकवून ठेवले असल्याचे जाणवत होते. उपासमारीत खितपत पडण्याची, पाण्यासाठी तडफडण्याची तिच्यावर सक्ती केली जात आहे आणि तान्हाजी तर कुणी दृष्टिपथातही नाही. दोर कापण्याच्या गप्पांना मात्र खूपच रंग चढला आहे.

वेळ ऐन दुपारची असली तरी ऊन बाधत नव्हते. प्रवास मजेत चालला होता. वरून चालताना डावी-उजवीकडची, तळची गावे वाळवण टाकल्यासारखी दिसत होती. तहानेने मात्र जीव व्याकुळला होता. एका वस्तीवरून घेतलेली चार लिंंबे या वेळी उपयोगी पडली. पाण्याची जागा बघून बरोबरचा जेवणाचा डबा उघडावा असे म्हणत होतो; पण दुपार टळत चालली, भुकेने पाऊल पुढे पडेना, तरी पाणी दिसायला तयार नव्हते. शेवटी तसेच जेवण उरकले. वाटाड्याची नाचणीची भाकर आणि लाल तिखटही चापले. तासाभराने मात्र एक धनगरवस्ती लागली. येथे आता नक्की पाणी मिळणार या विश्वासाने एका रिकाम्या खोपटात सरळ शिरलो व माती-

। ११९ ।