पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/118

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण शहाणे करून 'धरावे' असे तो सांगतो. असा 'धरून' ठेवलेला माणूस मोकळा-मुक्त-जागा कसा मानायचा ?

चालू शिक्षण कुचकामी आहे, व्यक्तीला ते कुटुंबापासून-समाजापासून अलग करते, खेड्यातून शहराकडे खेचते, नोकरीच्या सुरक्षित कुंपणाआड जगण्याची वृत्तीच फक्त या शिक्षणाने पोसली जाते, इत्यादी आक्षेप अगदी खरे आहेत. अनेकांनी आजवर ते घेतलेले आहेत. पण यावर उपाय ‘शिक्षण घेऊ नका' हा प्रचार नाही. गांधीवाद्यांनाही ही आधुनिक शिक्षपद्धती मान्य नव्हती. त्यांनी 'नई तालीम' काढून नव्या शिक्षणाचे प्रयोग सुरू केले व स्वराज्याचा लढाही चालू ठेवला. हे दुहेरी प्रयत्न गांधीजींना साधले याचे एक कारण म्हणजे त्यांचा भर माणसावर होता, त्याच्या मुक्त विकासावर होता. सत्ताप्राप्तीवर नव्हता, एखाद्या तत्त्वज्ञानाच्या साखळदंडात माणसाला अडकवण्यावर नव्हता. आजही गांधीवाद्यांचे ठिकठिकाणी प्रयोग सुरू आहेत. ते बहुतेक अपयशी आहेत हेही खरे आहे. पण ती Creative failures वाटतात. उद्याच्या यशाची पायाभरणी अशा अनेक अपयशातून होण्याची शक्यता दिसते. याउलट गोदाराणीचे यश आहे. उद्याच्या अपयशाची बीजे त्यात दडलेली आहेत. फळ चटकन पदरात पडते. पण चाखल्यावर ते कडू असल्याचेही अनुभवास येते. अनुयायांना अंधारात डांबून-कोंडून मिळविलेले यश हे मानवतेचे यश कधीही ठरत नाही. गुलामीचा नवा प्रकार म्हणून तो नोंदला जातो. लाल क्रांतीचे हे सर्वत्रचे आजवरचे अपयश आहे. लाल महाल तरी त्याला अपवाद कसा ठरणार ?

तळासरी भागात माणसाला अशीही एक नवीन जाग येत आहे.......

एका वसतीगृहात माझा आजचा मुक्काम आहे. वेळ संध्याकाळची आहे. मुले प्रार्थनेसाठी एकत्र जमलेली आहेत. स्वच्छ सारवलेल्या जमिनीवर सर्वजण रांगेने बसलेले आहेत. समोर गुरुजी व वसतीगृहाचे व्यवस्थापक विद्यार्थ्यांबरोबरच प्रार्थना म्हणताहेत. गीतेचा बारावा अध्याय झाला. गीताई झाली. रामरक्षा म्हटली गेली. विद्यार्थी सर्व आदिवासी-वनवासी. बारावा अध्याय स्पष्ट शब्दोच्चारांसह त्यांनी तोंडपाठ म्हटलेला पाहून मी चकीतच झालो होतो. मग परिचयाचा कार्यक्रम. पंचवीस की सत्तावीसजण असतील. आसपासच्या टापूतून आलेले होते. घरची बहुतेकांची गरिबी. आईवडिलांचा मुख्य उद्योग गवतकापणी. मोकळ्या वेळात घरच्या २-४ एकर पावसाळी शेतीची देखभाल. हा शांताराम रामू झोले, इयत्ता नववी; हा वसंत देवजी लहांगे; हा धनंजय माह्या करमोडा. सगळे सातवी ते अकरावीतले. कुणी खेळात चमकलेला आहे. कुणी निबंधात बक्षिसे मिळविलेला आहे. शरीरे बहुतेकांची काटक वाटली. वसतीगृहात सकाळी व्यायामाचा व संध्याकाळी खेळाचा कार्यक्रम नियमित घेतला जातो. कपडे स्वच्छ आहेत, बोलणे-चालणे मर्यादशील

। १११ ।