पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तळासरी महालातील लाल वर्तुळात वावरणाच्या वारली आदिवासींपैकी एकही व्यक्ती गेल्या वीस-पंचवीस वर्षात कॉलेजचा उंबरठा ओलांडू शकलेली नाही. अपवाद अर्थात असतीलही. पण प्रचाराचा मुख्य भर शिक्षणविरोधी आहे ही वस्तुस्थिती त्यामुळे बदलत नाही. निरनिराळ्या वर्तुळात मी फिरत होतो. वस्तुस्थिती अशीच असल्याचे मला सर्वत्र सांगितले गेले.

नऊ वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग सहज आठवतो. महाबळेश्वरला मी चाललो होतो. बरोबर एक परिचित कम्युनिस्ट होते. दहा वर्षांपूर्वी मतभेदामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला होता. प्रतापगड-महाबळेश्वर भागात घडलेला शिवकालीन इतिहास मी अधूनमधून, मला माहीत होता तेवढा, त्यांना ऐकवीत होतो. तेवढा ऐकूनही ते चकित झालेले होते. शिवाजीविषयीचा त्यांचा अभिमान जागा झाल्यासारखा दिसत होता. संभाषणात मधूनच ते आपली प्रामाणिक व्यथा सांगून गेले. व्यथा कोणती? ‘आमच्यासमोर हे कधी ठेवले गेलेच नाही. मी बी. एस्सी. फर्स्ट क्लास. पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचा तो काळ. घरी गडगंज पैसा. वडिलांनी परदेशी पाठविण्याची तयारीही केलेली होती. सगळे सोडून पक्षकार्याला लागलो. पण काम दिले गेले युनियनच्या ऑफिसमध्ये कारकुनी करण्याचे. वर्षानुवर्षे आपले मजुरांसाठी अर्ज भरतोय, अंगठे उठवून घेतोय. वाचन नाही. ज्ञानात वाढ नाही. माझ्यासारख्या बुद्धिमान कार्यकर्त्याला कुजवून पक्षाला तरी काय मिळाले ? आमचे तर आयुष्याचे नुकसान झालेच. व्यापक सामाजिक जीवनाशी, सांस्कृतिक क्षेत्रांशी संबंधच आला नाही. पक्ष सोडल्यावर त्यामुळे पोकळी निर्माण झाली. रामायण, महाभारत, आपली परंपरा, इतिहास यापासून अलग पडल्यासारखे वाटते. प्रवाहात सामील होता येत नाही. हे सगळे जुनाट, टाकाऊ असे पढविले गेले ना? वेरूळच्या शिल्पाकडे त्यामुळे कधी आकृष्ट होताच आले नाही. कार्यकर्त्यांच्या या सांस्कृतिक उपासमारीची फळे पक्षालाही भोगावी लागलीच. वास्तविक हे सगळे सामावून, प्रवाहाचा स्वीकार करून कम्युनिझमने येथे यायला हवे होते'...वगैरे वगैरे.

अजूनही 'असे' येथे येण्याची कम्युनिझमची तयारी नसावी. एरव्ही लाल महालातील शिक्षणविरोधी प्रचाराचा अर्थच समजू शकत नाही.

आपण मुल्लामौलवींबाबत नेहमी म्हणतो, की यांच्यामुळे बहुसंख्य मुसलमान समाज अज्ञानात राहिला. नवे ज्ञान, वेगळे वेगळे विचारप्रवाह मुल्लामौलवी आपल्या अज्ञ बांधवांपर्यंत पोहोचूच देत नाहीत. मला वाटते सर्वच बंदिस्त तत्त्वज्ञानांची ही शोकांतिका असावी. मनुच्या सनातन धर्मानेही शूद्रांचे शिक्षण हा अपराध ठरवला. कठोर शिक्षा यासाठी घालून दिल्या. कम्युनिझम हा आधुनिक धर्म. पण त्यालाही 'शहाणे करून सोडावे । सकळ जन' ही प्रेरणा नाही. सकळ जन आहे,

। ११० ।