पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/116

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माणसाला बेभान करणारी. मनाच्या वारूला मोकाट सोडणारी. त्यात ताडीमाडीचा चढलेला कैफ. पसरलेल्या पंखांसारखे समोर दिसणारे लाल निशाण. वृक्ष, आज्ञेची वाट पाहणाऱ्या सेनानायकासारखे खडे. वारा घोगावत असतो. वक्ता गर्जत असतो पिळवणुकीची जहाल वर्णने. क्रांतीचा जोष. उद्याच्या स्वर्गाची सोनेरी स्वप्ने. बस्स. काय हवे आणखी उत्साह ओसंडायला. हे तप्त रसायन एकदा डोक्यात घुसले की, सहसा त्याचा अंमल उतरतच नाही. कष्ट करून मोठा हो या सांगण्यात फक्त उपदेशच आहे. त्यामुळे तो कंटाळवाणा, रटाळ ठरतो. समुदायचे समुदाय त्याने उठत-उसळत नाहीत. पण 'हे समोरचे वाडे-बंगले तुझेच आहेत, तुझ्याच श्रमामुळे या बागा आशा लगडलेल्या आहेत. घे ताब्यात, आण लुटून'- हे शब्द विलक्षण धुंदी चढविणारे आहेत. काहीही घडवायचे, जोपासायचे, उभारायचे म्हणजे तपश्चर्या हवी, वर्षानुवर्षाचे एकाग्र परिश्रम हवेत. पण इतरांनी उभारलेले, जोपासलेले, घडविलेले केवळ झडप घालून बळकवायचे, लूट म्हणून आपल्या भोगासाठी दडपायचे! यासाठी केवळ हवा एखादा महत्त्वाकांक्षी नायक, एखादे बेहोषी निर्माण करणारे तत्त्वज्ञान ! बौद्धांचा अपवाद वगळता, समतेसाठी म्हणून उसळलेल्या आजवर सर्वच चळवळीत हे रसायन वापरले गेलेले आपल्याला आढळून येते. ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्' मध्येही हे असंस्कृत आवाहन असले पाहिजे. मध्यपूर्वेत उगवलेला हिरवा चाँद एक शतक पुरे होण्यापूर्वीच थेट स्पेनपर्यत पश्चिमेकडे फडफडत जातो, यातील रहस्य काय केवळ इस्लामी तत्त्वांची श्रेष्ठता ? गझनीचा महंमद हिंदुस्थानात येतो तो लूट गोळा करण्यासाठी, मूर्ती फोडण्यासाठी. इस्लामच्या समतास्थापनेशी त्याला कर्तव्य नसते. अर्थात केवळ लूट ही पशुता. शकहूणांच्या टोळधाडी आणि इस्लामची आक्रमणे यात म्हणूनच थोडा फरक पडला. चालू शतकात आशियात फैलावणाऱ्या कम्युनिझमचेही असेच एक अर्धसुसंस्कृत-अर्धरानटी, पण उन्मादक रसायन तयार झालेले आहे. गुलामीच्या जोखडाखाली शतकानुशतके ठेचून-पिळवटून निघालेल्या आशियातील कोट्यावधी भुकेकंगाल जनतेला मुक्तीचा एक नवा किरण या तत्त्वज्ञानात दिसला हे नाकारता येत नाही; पण हेही नाकारले जाऊ शकत नाही, की यशप्राप्तीसाठी या तत्त्वज्ञानाच्या पाईकांनी हिणकस आणि हीन अशा मानवी प्रवृत्तींना आवाहन केलेले आहे. माणसातील पशुला चाळवून संस्कृतीला लाजवणारी कृत्ये त्याच्या हातून घडविलेली आहेत.
'माणूस जेव्हा जागा होतो' तेव्हा तो असे वागत नाही.

डहाणू- तळासरी भागात शिक्षणाच्या सोयी आता बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहेत. पण लाल बावट्याचा या सोयी सवलतींवर बहिष्कार आहे. शाळेत जाऊन काय उपयोग ? पुढे खर्डेघाशीच करावी लागेल. कशाला मुलांना शाळेत पाठवून आजची मजुरी घालवायची ? लाल बावट्याचा असा प्रचार या भागात चालू असतो. मला

। १०९ ।