पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
वाढल की अर्धा परस.
मग ? पुन्हा माझा मख्ख प्रश्न आणि चेहऱ्यावर न आवरता येणारा वैताग.
आता ह्ये माझ्या एकल्यानं व्हनार हाय व्हय! आता एवढं केलसा, थोडं राह्यल्यालं......

पुन्हा एक शिसारी मला गिळण्याचा प्रयत्न करते. मी कसाबसा उठतो. तरातरा चालायला लागतो. हॉटेलातल्या चहाच्या कपाजवळ एक जंतू वळवळत असतो. विहिरीतले स्वच्छ, सुंदर जल वाकुल्या दाखवून नाचत असते. तेवढ्यात हॉटेलच्या मागून दोनचार बाया बाजारला येताना दिसतात. मी उगीचच समोरच्या पर्णहीन बाभळीच्या झाडाकडे पहात उभा रहातो. कुणीतरी विचारते, कवा आलासा ?

परवाच आलो वहिणी.

माझ्या उत्तराने वहिणी मोकळेपणाने बोलायला लागतात. जवळच्या बाया अवघडून उभ्या असतात. डोळ्यात भोळे कवतिक असते.

कोकण मानावल्यालं दिसतंया . घराकडंं आला न्हाई ? हिरीवर वेढ्याला यालच की.
नाही वहिणी. मला यावसं वाटत नाही. माझे बोलणे त्यांना मुळी 'उमजलं' च नाही.

त्या पुन्हा विचारतात, आमच्यावर रागावला तुमी ?

नाही हो. पण येऊन काय करू. उगीच विहीर पाडली.
उगीच का ? जाणारं येणारं वाईच टेकतंया. भाकर तुकडाबी खातंया. तुमास्नी नि साहेबास्नी मोप आसिर्वाद देत्यात पघा.
अहो, पण ती विहीर धान्याला पाणी देण्यासाठी साहेबांनी काढलीय ना ?
ते खरं हाय वो. पर ह्येंच्या अकलंत दिवा लागल तवा. चांगलं पाणी हाय. जमीन हाय. पर ह्यास्नी हिडाया हुवं गावातनं. आमची आपली बायकांची म्हन हाय, 'दैव देतं न् कर्म नेतं.' चांगलं सौताच्या जमिनीत राबावं, रक्ताचा घाम करावा, कुणाचं फट् म्हणून घेऊ नाई, शिवार फुलवावं. पर समदी उलथल्यात फुकटच्या गव्हावं......

असंच आणखी काही रतनलालने आपल्या ३ नोव्हेंबर ६९ च्या पत्रात मला कळविलेलं आहे.

पश्चिमेचे, श्रीमंत भांडवलशाही देशांचे, दुसऱ्या गरीब देशांना गुलाम करण्याचे हे गव्हाळी तंत्र. फुकट खायला प्यायला घालून माणूस लुळा पांगळा करून ठेवायचा;

। १०७ ।