पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सारे बुद्धीला आव्हान आहे. पण आज गावी परत आल्यावर समाजाचे एक भयाण आणि लाचार रूप पहायला मिळतं. आता लाचारी हळू हळू रक्तात भिनायला लागली आहे.

परवा एका कार्यकार्त्याशी बोलायचा प्रसंग आला. नुकतीच त्याने टोपी बदलली आहे. पहिल्यापेक्षा स्वारी जरा ऐटबाज वाटत होती. माझ्या कानाला लागून तो सांगत होता, ‘साथी, दुसरा इलाजच नव्हता. तिकडे गेलो म्हणून तर हा गव्हाचा बंधारा होतोय बघा.'

एक प्रकारची घृणा, शिसारी मला गिळून टाकण्याचा प्रयत्न करीत होती. आणि तो कार्यकर्ता मला आपण आपल्या पूर्वीच्याच राजकीय विचारांवर भक्कम असल्याचे असहाय्य मुद्रेने समजावून सांगत होता.

परवा 'माणूस' च्या विहिरीजवळचा एक शेतकरी मला हाक मारून सांगत होता- 'शेठ, आवंदा हुरडा खाया या. सायबास्नीबी बोलवा.'

का ? आपल्या विहिरीचे पाणी दिलेस वाटते ?
अजून न्हाय. पर आता द्यावं म्हणतुया.
विहिरीत पाणी किती आहे ?
पाऊसकाळात बरं होतं. तांब्या कलांडल्यावानी वाटायचं. आता असल परसभर.
म्हणजे अजून बरेच आहे. एक वेढा येईल की.
ईल म्हंजे इलच.
विहिरीतले दगड, गोटे काढलेस ?
लईदी इचार करतुया, पर ह्या भानगडींनी जमतच न्हाय.
भानगड ? ..... कसली रे ?
न्हाय. पोटापायी कुणी कुणी तलावाव जात्यात. आमचं ह्ये असलंच.

हॉटेलातल्या पोराला स्पेशलची ऑर्डर जाते.

मी शून्य चेहऱ्याने त्याला विचारतो, विहिरीतले गबाळ काढायला किती दिवस लागतील ? आठवडाभर ?

अवं येडं का शानं तुमी. दिड दोन दिसांच्या म्होरचं काम न्हाय.
गबाळ काढल्यावर पाणी किती वाढेल ?
। १०६ ।