पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुप्याला विहीर काढताना डोळ्यासमोर एक ध्येय होते. माणसांना स्वतःच्या पायावर उभे राहावयाला शिकवायचे. अन्न स्वतंत्रतेच्या आंदोलनात कुठेतरी मुहूर्ताची कुदळ टाकायची. या छोट्या प्रतीकांच्या रूपाने, या देशात, निदान शिवरायाची परंपरा मिशीला तूप लावून सांगणऱ्या महाराष्ट्रात, समर्थ अशा स्वावलंबी स्वातंत्र्याची गुढी उभारावयाची. या इवल्याशा प्रारंभाच्या वेळेपासून या विहिरीचे सुईणपण मी आजीबाईच्या काळजीने केले. आज विहीर तेथेच आहे. विहिरीत पाणीही आहे, मधून मधून शेतीला पाणीही दिले जाते; पण जो माणूस आपण घडवू इच्छित होतो, तो घडलाच नाही. या भागातल्या दुष्काळी परिस्थितीची आम्ही खूप दवंडी पिटली. या साऱ्याचा परिणाम काय झाला आहे हे आता स्पष्ट शब्दात सांगण्याची वेळ आली आहे.

यामुळे सुपे विभागाला शासनाने दुष्काळात 'अ' वर्ग दिला आहे. (दुष्काळी प्रदेशांचीही म्हणे आता ग्रेड ठरविण्यात येते ! ) देशभर असल्या ठिकाणांचा शोध घेत असलेल्या ख्रिश्चन मंडळींची गिधाडदृष्टी नेमकी येथेच येऊन पडली. अधिकारारूढ अदूरदर्शी नेतृत्वाला यातच आयती संधी चालून आली. फुकट गव्हावर तलावाच्या योजना घाईघाईने सुरू झाल्या. पावसात काही तलाव फुटलेदेखील. एका गावाला तर (देउळगाव रसाळ) एकाच लहानशा ओढ्यावर तीन तीन तलाव तयार करण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेने सुरू केलेले लहान लहान प्रकल्प मागे पडले. कामावर हजेरी लावली की गहू आणि तेलाचा रतीब सुरू होतो. पुणे जिल्हा परिषदेचा सुपे गावठाणचा तलाव तर त्यामुळेच गेली तीन वर्षे पूर्ण झाला नाही. गावगन्ना झालेल्या 'जी हुजूर' मंडळींनी मुकादमी पत्करून एक नवीन पकड सगळयांवर कायम केली आहे.

आता इथली मंडळी दुष्काळाला भीक घालणार नाहीत. सारा हवाला ‘कासा' संस्थेच्या शिरावर. या मंडळींनीही आपली नखे हळू हळू बाहेर काढावयास सुरुवात केली आहे. आता संस्थेचा अधिकृत माणूस आल्याशिवाय आठवड्याचा गव्हातेलाचा पगार होत नाही. लवकरच ‘प्रभूची करुणा' भाकल्याशिवाय ‘पगार' होणार नाही असे सांगितले जाण्याचा दिवस दूर नाही. आता तर योजनेची ‘लागण' पुरंदर तालुक्यालाही मोठ्या जाहिरातबाजीसह चालू करण्यात आली आहे. माजगावकर, कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण इथला मजूरदेखील पूर्वीसारखा अंग मोडून काम करीत नाही. हा अर्धशेतमजूर स्वतःचे शेतही धडपणे कसत नाही. तो म्हणतो, 'हतं कितीबी काम केलं तर चार पैसं थोडंच पदरात पडायच्यात ? सालं, गव्हाच्या तलावाव निस्तं हजेरी दावली की रोज लागू होतुया.'

तुम्ही मागे जेव्हा अन्न स्वतंत्रता संचलनात भाषणे करीत होतात, माणूसमध्ये लिहित होतात, डॉ. दांडेकर माणूसमध्ये लिहित होते, तेव्हा क्षणभर वाटायचे, हे

। १०५ ।