पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझ्या सुप्याचा अनुभव सांगितला, भायल्या मंगलच्या शेतात जाऊन आबांनी योजलेली विहिरीची जागा नजरेखालून घातली.

पाण्याची निश्चित जागा ठरविण्याची खात्रीलायक सोय आपल्याकडे नाही. अपेक्षित पाणी लागले नाही तर खर्च-मेहनत सारे वाया जाते. सुप्याला सुरुवातीला असेच घडले. पंचवीस-तीस फूट खणल्यावर जेवढे पाणी लागेल असे वाटले होते, पाणी पहाणान्याने सांगितले होते, त्यापेक्षा ते कमी लागले. सर्वांनी हातपाय गाळले. पहिला पावसाळा उलटला. विहिरीचा खड्डा पावसाच्या पाण्याने खूप भरला. दिवाळीच्या आसपास पिकासाठी एक पाऊस लागत होता, तो पडला नाही. हातीतोंडी आलेले पीक सुकून चालले. यापूर्वी अनेक वर्षे ते असेच वाळून जात असे; पण यंदा नवीन खणलेल्या विहिरीतील साठलेल्या पाण्याचा आधार होता. मंडळींनी इंजिने लावून पाणी खेचले व एरव्ही वाळून गेले असते ते पीक वाचवले. गेली दोन वर्षे या साठवणीच्या पाण्याचा अशा मोक्याच्या वेळी उपयोग होत आहे. शंभर टक्के नाही तरी पन्नास-साठ टक्के श्रम आणि पैसा त्यामुळे सार्थकी लागलेला आहे. शंभर टक्के यशासाठी हा विहीर-कम-खड्डा प्रयोग हमखास पावसाळी भागात हाती घेतला जावा ही आबांची सूचना होती. पाणी लागले तर बांधकामाचा खर्च करून विहीर पूर्ण करायची. नाही लागले तर साठवणीचा खड्डा म्हणून उपयोग आहेच. ठाणे-कुलाबा-रत्नागिरी हे आपल्याकडील हमखास पावसाचे जिल्हे. या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसमोर मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम ठेवण्यासारखा आहे. श्रमाचे तंत्र लवकर आत्मसात होऊ शकणारे. उत्पादनवाढीला निश्चित हातभार. खर्चही बेताचा. आबांच्या घरी आदल्या रात्री हाच विषय चर्चेला होता. प्रा. गोपाळ राणे व उत्क्रांती दलाचे काही कार्यकर्ते हजर होतेच. भायल्या मंगलच्या शेतातील विहीर या दृष्टीने नाताळाच्या सुटीत पुरी करण्याचे ठरले.

आणि मी चर्चेचे निष्कर्ष अधिक बारकाईने तपासून पहाण्यासाठी तसाच पुढे ठाणे जिल्ह्यातील डहाणू-तलासरी भागात - गोदाराणीच्या लाल महालात शिरलो.

तेथे पाहतो तो लाल बावट्याचे प्रचारयंत्र नेमक्या उलट दिशेने फिरत आहे असे कानावर आले.

सुपे येथील कामात आणखी एक दोष होता. ते मदतभावनेने सुरू झालेले होते. १९६८ साली महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला होता. शासनाप्रमाणेच विविध सामाजिक संस्थांनीही दुष्काळनिवारण कार्यात भाग घेतलेला होता. सुपे हा नेहमीचाच दुष्काळी भाग. रतनलाल भंडारी सारखा प्रामाणिक व तळमळीचा कार्यकर्ता येथील दैनंदिन कामाची जबाबदारी उचलण्यास तयार होता

। १०३ ।