पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वगैरे जामानिमा भरपूर असला पाहिजे. गोठ्यात जनावरे पंधरा-वीस तरी दिसत होती. शिवाय मोटारसायकल, स्कूटर, व्यवस्थित बांधलेला पक्क्या विटांचा बंगला यावरून कुळ मोठे असावे हे सहज लक्षात येत होते. या ठिकाणापासून जवळच कम्युनिस्टांचे एक 'स्टॉर्म सेंटर' पूर्वी होते अशी माहिती नंतर मला मिळाली. या स्टॉर्म सेंटरचा प्रभाव गोरगरिबांवर दहशत बसविण्यापलीकडे काही नसावा? मी जी बाग पहात होतो तिच्या मालकाचे तर म्हणे पक्ष-कार्यकर्त्यांशी घनिष्ठ संबंधच आहेत. हप्ते अधून मधून पोचवले जातात, निधींना वेळोवेळी देणग्या दिल्या जातात, बंगल्यावर पक्षसदस्यांची उठण्याबसण्याची, उतरण्याची सोयही होत रहाते. या व्यवहाराला तात्विक मुलामाही चढविण्यात येतो. 'आज या चोरांचे घ्यायला काय हरकत आहे? उद्या सत्ता हाती आल्यावर यांच्याकडून सर्वकाही काढून घ्यायचेच आहे' तत्त्व आणि व्यवहार यातील भयानक विसंगती अशा तऱ्हेने साधली जाते.

बहुतेक सावकारांकडे जमिनी पूर्वीप्रमाणेच आहेत. कुळकायद्यामुळे म्हणावा असा फरक पडलेला नाही. सरकारी मालकीच्या जंगलजमिनीवरील अतिक्रमणांचे प्रमाण त्यामानाने बरेच मोठे आहे; पण आदिवासींच्या ताब्यात आलेल्या अशा दोन-दोन, चार-चार एकर जमिनींच्या मशागतीबाबत मात्र लाल बावट्याचा प्रचार उलट सुरू असतो.

मी पहात होतो, विहिरी खणण्याबाबत सर्वसामान्य आदिवासी शेतकऱ्यात येथे उत्साह किती आहे? एका शेतीतज्ज्ञाशी आदल्याच दिवशी या विषयावर चर्चा झालेली होती. माझ्या आणि त्यांच्या विचाराचा खटका याबाबत बरोबर जमत होता. दिंडोशीचे आबा करमरकर. दुधात थेंबभरही पाणी न मिसळता डेअरीचा धंदा मोठ्या प्रमाणावर यशस्वी करून दाखविणारा मला भेटलेला पहिला माणूस! एक पैचीही लाच न देता यांच्या दुधाच्या ट्रक्स लांबवर पळत असतात. पारगावसारख्या पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागात व दिंडोशीच्या भरपूर पावसाच्या जमिनीत यांचे शास्त्रोक्त शेतीचे प्रयोग नेहमी चालू असतात. मुंबईच्या गोरेगाव उपनगर विभागात समाजवादी पक्षाचे आबा जुने कार्यकर्तेही होते. अलीकडे आबांचा एकूणच पक्षपद्धतीवरचा विश्वास उडालेला आहे, म्हणून फारसे ते कुठे चळवळीत दिसत नाहीत. युवकक्षेत्राविषयी मात्र त्यांना आजही आस्था आहे. या क्षेत्राला काही विधायक वळण लावावे यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. 'साधने'त त्यांचा एक लेख अलीकडेच प्रसिद्ध झाला होता- ‘भायल्या मंगलची हाक.' मी तो वाचला होता. बोरिवली तालुक्यातील मागाठणे गावचा भायल्या एक आदिवासी शेतकरी. त्याच्या शेतात विहिरी खणण्याचा कार्यक्रम गोरेगाव येथील उत्क्रांती दलासमोर आबांनी ठेवला होता. इतरांनाही त्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे या लेखात आवाहन केलेले होते. या लेखाच्या अनुरोधाने दिंडोशीला जाऊन मी त्यांच्याशी चर्चा केली,

। १०२ ।