पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रहाताना, अंगावर चालून जाताना, घायाळ झाल्यावर चडफडताना ती कशी दिसली असेल ? नंतर बराच वेळ हे दृश्य कल्पनेने मी डोळ्यासमोर आणीत होतो. राणीच्या जोडीदाराचे-शामराव परुळेकर यांचे-काही वर्षांपूर्वी निधन झाले. उभयतांच्या आठवणींचे एक पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्याचे नाव जाहिरातीत वाचले तेव्हाच मी जरा चपापलो होतो-माणूस जेव्हा जागा होतो! लाल घणाघाताखाली हे प्राजक्तपुष्प कसे काय उमलले?

कैनाडचा डोंगर हाकेच्या अंतरावर पहुडलेला होता. एका पाड्यावर माझी आजची वस्ती होती. उद्या जो डोंगर साद घालील, जे गाव खुणावेल तिकडे जायचे होते. नाहीच कुणी हाक मारली तर सरळ घरी परतायचे होते. आजची वस्ती तर सोयिस्कर होती. मधून मधून गप्पा, प्रश्नोत्तरे, झोप, वाचन असा संथ क्रम सुरू होता. आसपासची शेतीची कामे दुपारनंतर चालू झालेली दिसली नाहीत, म्हणून सहज चौकशी केली. 'मंडळी सगळी आज आशागडच्या सभेला गेलेली आहेत' असे कळले. डहाणूपासून पाच-सहा मैलांवरचे आशागड हे एक मध्यम आकाराचे आदिवासी गाव. जेवणाची सुटी न घेता काम लवकरच संपवून किंवा अर्धवट सोडून शेतावरील सर्व स्त्री-पुरुष मजूर आशागडला सभेसाठी धावल्याचे पाहून माझे कुतूहल जागे झाले. थोडी विचारपूस केली. तर कळले की, सभा लाल बावट्याची असली तर न जाऊन येथे चालतच नाही. दमदाटी होते. मारहाण केली जाते. मजुरी बंद पडते. या छळवादाला तोंड देण्यापेक्षा सर्वसामान्य माणूस म्हणतो-सभा परवडली. मग इकडे शेतीचे कितीही नुकसान होऊ दे.

एखादा तंटा उपस्थित होतो. लाल बावटा तेथे असला तर हिरव्या गर्द बागाच्या बागा सुकवल्या जातात; पण कामाला एकाही माणसाची हात लावण्याची हिंमत होत नाही. कोणी लावलाच तर त्याची गठडी वळली गेलीच. रात्री-अपरात्री त्याच्या झोपडीवर जमावाचा हल्ला होईल, ती कदाचित् जाळूनही टाकली जाईल, हात-पाय बांधून मारपीट होईल, कोंबडी-बकरे वगैरे त्या कुटुंबाजवळ जे असेल ते हिसकले जाईल-ग्रामीण दहशतीची सर्व तंत्रे लाल बावट्याच्या नावावर उपयोगात आणली जातील.

पण सावकाराकडील जमीन कमी झाली का? जी जमीन कुळांकडे आली ती तरी कुळे नीट कसतात का? त्याचा सारा सरकारला किंवा सावकाराला भरतात का? सरकारी योजनांचा फायदा कुळांना मिळतो का?

सकाळच्या वाटचालीत मध्येच एक प्रचंड बाग लागली होती. सहज तीन-चारशे एकरांचा मळा असावा. विजेचे खांब, तारेचे कुंपण दिसले-त्यावरून आत विहिरी, पंप्स

। १०१ ।