पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/107

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुमारासच ‘गोदाराणी' ही कादंबरी प्रसिद्ध झाली होती. लेखक हडप असावेत. तिच्या आधारे डॉक्टरांनी वारल्यांची भयानक दुःस्थिती फार प्रभावीपणे आम्हा विद्यार्थ्यांसमोर उभी केली. गोदाराणी हे नाव प्रथम तेव्हाच कानी पडले. बैठकीनंतर नेहमी काही खाण्याचा कार्यक्रम असे. मला इतके आजही आठवते की, त्या दिवशी पुढे आलेली साबुदाण्याच्या खिचडीची बशी आम्हा सर्वांनाच त्या वारल्यांची फार क्रूर थट्टा वाटून गेली होती. बशा संपल्या पण अपराधी भावनेची टोचणी कायम राहिली. कानांनी ऐकले, कानांनी सोडून दिले. हातापायात काही संचारलेच नाही. स्मृतीचा एक बारीकसा ठिपका मात्र तळाशी कुठेतरी दडून राहिलेला होता.

पुढे सहज शक्य असतानाही या राणीला मी कधी भेटलो नाही, तिच्या राज्यात कधी डोकावलो नाही. गेल्या वर्षी मात्र ती फार आजारी आहे असे कळले. तेव्हा समाचाराला म्हणून गेलो. दरम्यान प्रकृती खूपच सुधारलेली होती. मग बोलणे वाढले, गप्पा रंगल्या, चर्चेतून मतभेदाचे व मतैक्याचे मुद्दे स्पष्ट होत गेले. वृद्ध असली तरी राणी अद्याप खचलेली वाटत नव्हती. या वयात, या अवस्थेतही, शब्दाशब्दात आत्मविश्वास ठासून भरलेला होता. ध्येयवादाचा एकही पीळ सुटलेला नव्हता. स्वरातील धार जराही बोथटलेली नव्हती. मध्येच थोडा मिशनऱ्यांचा विषय निघाला होता. ठाणे जिल्ह्यात हे संकट बरेच आहे. राणी उसळून म्हणाली होती 'आमचे हात काही केळी खायला गेलेले नाहीत. त्यांनी फार गडबड केली तर चोवीस तासांत त्यांना चंबूगबाळ्यासकट फेकून देऊ.' यावेळी राणीच्या क्षीण हाताची पाच बोटे एखाद्या पात्यासारखी पदराआडून बाहेर चमकत आली होती. सावरकरांची बोटे यापेक्षा अधिक नाजूक, निमुळती व गोरीपान होती. संभाषणात ती अशीच वीजेसारखी चमकून जात. त्यांची आठवण या राणीच्या बोटांनी मला यावेळी करून दिलेली होती. क्रांतीच्या दाहातून तावून सुलाखून निघालेली एक सतेज, रसरशीत मूर्ती खूप काळानंतर मी पहात होतो. शेकडो कार्यकर्त्यांना मी आजवर भेटलेलो असेन. ध्येयसिद्धी दुरावल्याने बहुतेकजण निराशेने कोमेजलेले दिसले. कोणी स्पष्टपणे आपली निराशा शब्दातून व्यक्त करतो, कोणी आध्यात्मिक परिभाषेचे अवगुंठन चढवून ती लपवू पाहतो. तसे पाहिले तर राणीच्या राज्याला खिंडार पडावे, निष्ठेला तडे जावेत असे खूपच काही गेल्या पंचवीस वर्षांत जगात आणि भारतात घडलेले आहे. पण राणीची लाल निशाणावरील श्रद्धा अढळ आहे. ना. म. जोशांपासून दलित सेवेचे व्रत तिने उचलले. शेकडो संस्थातून विविध प्रकारची दलितोद्धाराची कामे केली. शेवटी कम्युनिझमशिवाय तरणोपाय नाही या विचारावर ती येऊन ठेपली. हे वादळी वारे पिऊन, पंचवीस वर्षांपूर्वी ही वाघीण जेव्हा डहाणू-उंबरगावच्या जंगलात झेपावली, तेव्हा, त्या कडेकपाऱ्यातून हिंडताना,एखाद्या पाड्यावर विसावताना, सावज दिसताच डरकाळी फोडताना, गुहेत लपून

। १०० ।