Jump to content

पान:शेती-पशुपालन.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साहित्य : प्लॅस्टिक कॅन , पाणी, केशनलिका, एम-सील (गरजेनुसार इतर साहित्य) इत्यादी. साधने: पोगर (०.५ ते०१ मि.मी.चा), घड्याळ , मोजपात्र इ. आकृती: कृती :(१) प्लॅस्टिक कॅनला पोगरच्या साहाय्याने तळाकडील बाजूस एक होल पाडा. (२) त्या होलमध्ये केशनलिका फिरवून बसवा. (३) केशनलिका बसवलेल्या ठिकाणी पाण्याची गळती होऊ नये म्हणून त्या ठिकाणी एम.सील लावा. (४) एम.सील वाळण्यासाठी तो जोड अर्धा तास तसाच ठेवा. (५) नंतर कॅनमध्ये पाणी भरून झाडाच्या जवळ ठेवा. (६) केशनलिकेतून थेंब-थेंब पाणी बाहेर पडेल ते टोक झाडाच्या बुंध्याशी सोडा. (७) नंतर ते टोक मोजपात्रात पाच मिनिटे धरून बाहेर पडणारे पाणी मोजा व प्रमाण ठरवा. (८) केशनलिकेतून बाहेर येणारे पाणी कमी करण्यास नलिकेला शेवटी गाठ मारा/नलिकेत तार/काडी घाला. दक्षता : (१) केशनलिकेत काही कचरा अडकून पाईप लाईन बंद होऊ नये यासाठी पाणी गाळून कॅनमध्ये भरा. (२) कॅन उन्हात तापून खराब होऊ नये/शेवाळे होऊ नये म्हणून त्यावर गवताचे आच्छादन टाका. आपणांस हे माहीत आहे का? (१) फळबागांसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा उपयोग करणे जास्त फायद्याचे आहे. (२) पिकांना कृत्रिमरित्या पावसासारखे पाणी देण्याच्या पद्धतीस तुषार सिंचन असे म्हणतात. (३) झाडांच्या गरजेनुसार कमी-जास्त पाणी देता येते. (४) या पद्धतीने खतांच्या मात्राही देता येतात. (५) एका दिवसाला एका रोपाला लागणारे पाणी मोजता येते. स्वाध्याय :(१) जवळच्या फळबागेतील ठिबक सिंचन पद्धतीची प्रत्यक्ष माहिती घ्या. (२) त्यासाठी आलेल्या खर्चाचे अंदाजपत्रक काढा. (३) एकाच वयाच्या दोन झाडांना मोकाट व ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन त्यांच्या वाढीतील फरकांच्या नोंदी ठेवून काही दिवसांनी पहा. विशेष माहिती : जमिनीतील पाणी कसे मोजावे ? जमिनीत लोखंडाची सळई घालायची. सळईस फारसा जोर न लावता जमिनीत गेली की जमिनीत भरपूर पाणी आहे असे समजावे. सळई ठोकताना त्रास झाला तर जमीन कोरडी आहे हे लक्षात येते. फिल्ड कपॅसिटी म्हणजे काय? पाऊस पडल्यावर किंवा जमिनीस कृत्रिम पाणी पुरवठा केल्यानंतर ३-४ दिवसात वाहणारे पाणी वाहून जाते. त्यानंतर जमिनीत पाणी भरून ठेवण्याची जेवढी क्षमता असेल तेवढेच पाणी जमिनीत शिल्लक राहते. त्यास फिल्ड कपॅसिटी असे म्हणतात. जमिनीतील पाण्याचे वजन? सॉइल ऑगरच्या साहाय्याने २ फूट खोलीची माती घ्यायची व तिचे वजन करायचे. वजन घेतल्यानंतर ही माती ओव्हनमध्ये किंवा साध्या पत्र्यावर 105-110°C पर्यंत तापवून कोरडी करायची. या कोरडया मातीचे वजन करायचे. या दोन वजनातील फरक म्हणजेच त्या मातीत असणाऱ्या पाण्याचे वजन होय. पाण्याची आर्द्रता टक्केवारीत मोजतात. ३७