पान:शेती-पशुपालन.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रवंथ करणारी जनावरे : शेळ्या, गाई, म्हशी ही रवंथ करणारी जनावरे आहेत. रवंथ करणाऱ्या जनावरांत पचनक्रिया वेगळी असते. अन्न खाताना गाय विशेष न चावता खाते. लाळेबरोबर हे अन्न रूमेन (ओटीपोट) मध्ये जाते. रूमेन (Rumean) हे एक मोठ्या पिशवीसारखे इंद्रिय आहे. ते शरीराच्या डाव्या बाजूला असते व त्यात पुष्कळ जिवाणू असतात. ते या अन्नावर वाढतात. पशुखाद्यात मुख्यत्वेकरून वैरणीत - तंतुमय पदार्थ (सेल्युलोज वगैरे) असतात. जिवाणू ते सुद्धा खातात. यामुळे अन्नाचे स्निग्ध पदार्थ व आम्लात रूपांतर होते. याचवेळी पोषक परिस्थिती मिळाल्यामुळे जीवाणूंच्या संख्येतही वाढ होते. या क्रियेत जीवाणू युरियाचे प्रथिनांमध्ये रूपांतर करतात. शिवाय बरीच जीवनसत्वेही तयार करतात. जनावर जेव्हा रवंथ करते त्यावेळी रूमेनमधील अन्न परत तोंडात येते व बरेच चावून झाल्यावर मग पोटात जाते. तेथे पूर्ण पचन होऊन ते शरीरात शोषले जाते. रूमेनमधील जिवाणूंच्या क्रियांमुळे पुढील परिणाम दिसून येतात. (१) सेल्युलोजसारख्या तंतुमय पदार्थातून सुद्धा जनावराला ऊर्जा मिळते. (२) युरियामधून प्रथिने मिळतात. (३) कमी दर्जाच्या प्रथिनांमधून जरूर ते प्रथिन बनते. (४) 'ब' गटातील जीवनसत्त्वे रूमेनमध्ये तयार होतात. (५) रूमेनमध्ये मिथेन उत्पादक जीवाणू भरपूर वाढतात व ते शेणातही भरपूर असतात. यामुळेच गोबरगॅस तयार होतो. (६) बुरशी व सरकीतील काही अपायकारक पदार्थ रूमेनमध्ये नष्ट होतात. त्यामुळे जनावरांना त्यापासून थोडेफार रक्षण मिळते. पक्षी : कोंबड्यांना चोच असते, पण दात नसतात. त्यामुळे त्या अन्न न चावताच गिळतात. त्यांच्या पोटाच्या जागी गिझार्ड इंद्रिये असतात. त्याच्या बाजूला बळकट स्नायू असतात. हे स्नायू गिझार्ड इंद्रियांकडून चोळले जातात. त्यावेळी आतील खाद्य, पचनद्रव्ये वगैरे वाटली जातात. (आपण दगडावर मसाला वाटतो त्याप्रमाणे) त्यामुळे पचन लवकर होते. खाद्यात काही प्रमाणात बारीक वाळूसारखे कण असले तर या वाटण्याच्या क्रियेला त्यांची मदत होते. लक्षात ठेवण्याच्या गोष्टी : कोंबड्यांना महत्त्वाची प्रथिने खाद्यातून द्यावी लागतात. ही प्रथिने त्यांना स्वतःला बनवता येत नाहीत. सर्व जीवनसत्वे व अँटिबायोटिक्स अन्नातून देतात. अन्नातील उणिवा लवकर जाणवतात. बुरशी वगैरे अपायकारक घटकांचा लगेच परिणाम होतो. शरीराचे तापमान : गाईचे तापमान साधारणतः ३९ अंश सेल्सिअस असते. कोंबड्यांचे जवळजवळ ४२ अंश सेल्सिअस असते. कोंबड्यांना उष्णता जास्त जाणवते व त्यांचे तापमान जास्त झाल्यास त्या मरतात. संदर्भ : (१) सामान्य विज्ञान, इ. ६ वी, प्रकरण ४, मापन, पान नं. ४२, तापमानाचे मापन, प्रकाशन-२००७. (२) सामान्य विज्ञान, इ.७ वी, प्रकरण ३, पान नं.२४-२५, तापमापी, प्रकाशन-२००५ १८