एक
एखाद्या पुस्तकाची शंभर वर्षे पुरी झाल्याचा समारंभ होणे, उत्सव होणे ही क्वचितच घडणारी गोष्ट. मराठी पुस्तकाच्या बाबतीत तर हा अगदीच दुर्मीळ योग. महात्मा जोतीबा फुल्यांच्या 'शेतकऱ्याचा असूड' या पुस्तकाची शताब्दी महाराष्ट्रभर साजरी झाली, गावोगाव समारंभ झाले. वैजापूरच्या मंडळींनी तर या पुस्तकाची पालखीसकट दिंडी काढली.
१९७३ मध्ये, दहा वर्षांपूर्वी मार्क्सच्या 'भांडवल' ग्रंथाची शताब्दी झाली. आज महात्मा फुल्यांच्या 'शेतकऱ्याचा असूड' पुस्तिकेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्याचबरोबर शेतकरी संघटनेच्या विचाराची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत.
या प्रसंगाच्या निमित्ताने काही प्रश्न साहजिकच मनात उभे राहतात. शेतकरी संघटनेने शेतीविषयी, देशाच्या अर्थकारणाविषयी एक नवा विचार मांडला आहे. शंभर वर्षांपूर्वी याच प्रश्नाचा विचार महात्मा फुल्यांनी केला. या दोन विचारांचे एकमेकांशी काय नाते आहे? हे दोन विचार कितपत जुळतात? फरक काय आहे? तो फरक का?
या पलीकडे जाऊन आणखी एक विचार सहज येतो. मार्क्स व फुले जवळजवळ समकालीन. एक इतिहासातील द्रष्टा, युरोपात औद्योगिक क्रांतीच्या भर धामधुमीत जन्मला. दुसरा युरोपातील औद्योगिकीकरणाचे वारेही न लागलेल्या, दारिद्र्यात अधिकाअधिक बुडत असणाऱ्या भारतात जन्मलेला. मार्क्सला शिक्षणाचा फायदा भरपूर मिळालेला. बर्लिन विद्यापीठात तत्त्वज्ञानाची सर्वोच्च पदवी मिळविलेली. फुल्यांचे शिक्षण संपल्यावर नऊ वर्षांनी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली; पण दीनदुबळ्यांच्या प्रत्यक्ष जीवनाशी घनिष्ठ अभ्यासपूर्ण संबंध. मार्क्स व फुले यांच्या विचारांची ही तुलना मोठी उपयोगाची ठरेल.
'शेतकऱ्याचा असूड' पुस्तकाच्या शतब्दीनिमित्ताने या दोन प्रश्नांविषयी थोडा ऊहापोह करावयाचे ठरविले आहे.
शेतकऱ्यांचा असूड आणि शेतकरी संघटना
शेतकऱ्यांच्या परिस्थितीविषयीचे महात्मा फुल्यांनी शंभर वर्षांपूर्वी रेखाटलेले चित्र पाहिले म्हणजे आजही अचंबा वाटतो.
पूर्वी काही परदेशस्थ व यवनी बादशहा व कित्येक स्वदेशीय राजेरजवाडे या