पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/97

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आविष्कार आहे. खेड्यांच्या स्वावलंबनावर आधारलेली अर्थव्यवस्था हा गांधीवादाचा पाया आहे. गांधीजींचे सर्व धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान हा त्या पायाचा परिपोष आहे.

 'शेतकऱ्याचा असूड' व त्यात मांडलेली शेतकऱ्यांच्या शोषणाची कहाणी हा फुले-मताचा पाया आहे. विश्वाच्या उपपत्तीपासून उत्पादक समाजाचे हिंसाचाराने झालेले शोषण हे जोतीबांच्या विचाराचे मध्यवर्ती सूत्र आहे. आजच्या डाव्या विचारवंतांनाही आकलन न झालेले शेतकरी समाजाचे स्पष्ट चित्रण जोतीबांनी अगदी विदारकपणे मांडले. हे सत्य त्यांना प्रत्यक्ष टोचले म्हणून जाणवले. सवर्णांनी केलेले शूद्रांचे शोषण हा विषय मांडायचा तर त्यांना ब्राह्मण ग्रंथातील विश्वाच्या उपपत्तीपासून सर्व कल्पनांवर हल्ला चढविणे भागच होते; इतिहासाचा नवा अर्थ सांगणे आवश्यक होते. सत्यशोधक धर्म हा त्यांच्या प्रतिभेचा विलास होता. शूद्रांचे, स्त्रियांचे शिक्षण हा त्या काळास अनुरूप असा त्यांचा कार्यक्रम होता. भविष्याकडे पाहतांना 'एकमय लोक' या अर्थाने हिंदूस्थान हे एक राष्ट्र नाही याची त्यांना जाणीव होती. 'एकमय लोक' तयार न होता इंग्रज निघून गेले आणि स्वातंत्र्य मिळाले तरी सर्वसामान्य जनतेची परिस्थिती बदलणार नाही; एवढेच नाही तर शूद्रादिअतिशूद्र न्याशनल काँग्रेसात कधीही सभासद होणार नाहीत असेही प्रतिपादन त्यांनी केले.

 जोतीबांचा विचार जातीयवादी नव्हता, आर्थिकच होता; पण जोतीबांच्या काळापर्यंत आर्थिक इतिहासातील महत्त्वाचा घटकच मुळी जाती हा होता. त्यांच्या शिष्यांनी हिणकस तेवढे उचलले.

 आज परिस्थिती अशी आहे, की जोतीबांचे संरक्षण करण्यासाठी उतरलेल्यांनाही जोतीबांचा विचार समजलेला नाही आणि पचलेला नाही. ते समर्थनाला आले ते चुकीच्या अभिनिवेशाने. जोतीबांवर वेडेवाकडे हल्ले करणारे, 'एकमय लोक' प्रत्यक्षात अस्तित्वात आहे असे मानणारे त्यांचे विरोधकही त्याच मताचे. विरोधक आणि संरक्षक यांच्या मूलभूत भूमिकेत फरक तसा काहीच नाही. झुंज लागते ती केवळ अभिनिवेशाने. जोतीबांवरील चर्चा या पातळीला उतरावी हे जोतीबांचे खरे दुर्दैव. प्रस्तुत पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती निघाल्याने जोतीबांवरील चर्चेला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल अशी आशा आहे. आंबेठाण
शरद जोशी 
 

 दि. १७ फेब्रुवारी १९८९

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ९२