तत्त्वज्ञान मिळाले ते दरिद्रीनारायणाची पूजा बांधणाऱ्या गांधीविचाराचे. गरज सरताच या व्यापारी कारखानदारांनी तडकाफडकी गांधीविचाराचे कातडे फेकून देऊन आपले स्वरूप प्रगट केले.
थोडक्यात, विचार हा कारक नसतो; विचार ही एक सोय असते. सोईस्कर विचार आंदोलनाला वाचा देतो, प्रेरणाही देतो, पण शेवटी अर्थकारण खरे. विचार हा अर्थकारणाचे प्रतिबिंब हेच त्याचे खरे स्वरूप.
प्रत्येक बदलाचा, प्रत्येक क्रांतीचा म्हणून एक विचार असतोच; मग प्रत्येक बदलाच्या वेळी असा एक सोईस्कर विचार उपलब्ध होतो हे कसे ? तो उपलब्ध होतो एवढेच नव्हे तर क्रांतीच्या नाट्याच्या रंगमंचाच्या आसपास तो बराच काळ वावरत असतो आणि योग्य वेळ येताच सोईस्कररीत्या उचलला जातो. हे प्रत्येक वेळी कसे होऊ शकते? प्रत्येक विचार हा एक स्थलकालाचे प्रतिबिंब असते हे लक्षात घेतले, की या योगायोगाचा काही चमत्कार वाटण्याचे कारण राहत नाही. कोणत्याही एका समाजातील वेगवेगळ्या व्यक्तींचा एक आलेख काढावयाचा आहे असे समजूया. आलेख कशाचाही असो; उंचीचा, वजनाचा, आर्थिक, मानसिक परिस्थितीचा असो. उंचीचा आलेख घेतला तर समाजातील लोकसंख्येच्या सरासरी उंचीची एक रेषा काढता येईल. या सरासरी उंचीच्या आसपास उंची असलेले खूप लोक असतात. सरासरी उंचीपासून जितके दूर जावे, वर जावे किंवा खाली जावे तितकी लोकांची दाटी कमी होत जाते. उंचीच्या कोणत्या गटात किती माणसे सापडतील याचे संख्याशास्त्रीय नियम आहेत. एका मर्यादेपलीकडे गेल्यानंतर सहसा कोणीच माणूस त्या उंचीचा असत नाही. उदाहरणार्थ, समजा, एका समाजातील लोकसंख्येची सरासरी उंची साडेपाच फूट आहे, तर त्या त्या समाजातील पुष्कळ माणसे सव्वापाच ते पावणेसहा फुटांच्या दरम्यानच सापडतील. त्यानंतरचा मोठा गठ्ठा पाच ते सव्वापाच फूट व पावणेसहा ते सहा फूट उंचीच्या माणसांचा सापडेल. साडेचार फुटांपेक्षा कमी किंवा साडेसहा फुटांपेक्षा जास्त उंचीची माणसे क्वचितच सापडतील.
आर्थिक दृष्टिकोन घडविणारे घटक अनेक असतात. या वेगवेगळ्या घटकांचा समुच्चय करणारा निर्देशांक काढला आणि त्या निर्देशांकाच्या मूल्याप्रमाणे लोकसंख्येचा आलेख बनवला तर त्या आलेखाचे रूप हे उंचीच्या किंवा वजनाच्या आलेखासारखेच राहील. म्हणजे थोडक्यात, निर्देशांकाच्या सरासरी पातळीच्या आसपास सर्वांत मोठा गठ्ठा आणि सरासरीपासून जितके दूर जावे तितकी लोकसंख्या अधिकाधिक विरळ.