पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निपाणी भागात एकरी ११०० किलो तंबाखू काढलेले शेतकरी आहेत. पण तो एक चमत्कार होता. ८०० किलो तंबाखू काढणारे पाच दहा शेतकरी सापडतील. पण सर्वसाधारणपणे सरासरी २४० ते २८० किलो असं सरासरी उत्पादन आहे. परवडत नाही म्हणून दरवर्षी शेतीत घातला जाणारा खर्च कमी कमी होत जातो. तरीसुद्धा संघटनेने हा आकडा एकरी ३२० किलो धरला आहे. सरासरीपेक्षा जास्त का धरला आहे? तर आपल्याला प्रथम सरकार किंवा व्यापाऱ्यांकडून उत्पादन खर्च भरून निघाला पाहिजे ही कल्पना मान्य करून घ्यायची आहे. उसाचंसुद्धा महाराष्ट्रातील सरासरी उत्पादन एकरी ४० ते ४२ टन आहे. तरीसुद्धा उसाला टनाला ३०० रु. भाव मागताना आपण ते एकरी ५० टन धरले आहे. आमचं म्हणणं, उत्पादन थोडं जास्त धरा पण आमचा खर्च मान्य करा.
 अशा पद्धतीनं आपल्याला उत्पादन खर्च काढायला हवा. काही खर्च उघड उघड असतात, आपल्याला डोळ्यांनी दिसत असतात, आपल्याला मोजायला लागतात. त्यांच्याबरोबर काही खर्च डोळ्यांनी दिसत नाहीत. आपल्याला प्रत्यक्ष मोजायला लागत नाहीत. असे सर्व खर्च लक्षात घेऊन एका बाजूला खर्च काढायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला उत्पादन किती होतं ते काढायला पाहिजे. खर्चाच्या रकमेला उत्पादनाच्या आकड्यानं भागलं म्हणजे आपल्याला तंबाखूच्या एका किलोमागे, ज्वारीच्या एका क्विटमागे किंवा उसाच्या टनामागे काय खर्च येतो ते कळेल. म्हणजे वाण्यानं १००० रु. चा माल आणला तसं आपण जो माल तयार करून विक्रीस आणला त्याचा खर्च किती आला हे आपल्याला त्यावरून मिळेल.
 काही उत्पादनांचे खर्च आणि त्यांना मिळत असलेल्या बाजारभावाचे आकडे पुढीलप्रमाणे -
 १९७९ साली भुईमुगाचा उत्पादन खर्च किलोला ४.३० पैसे होता. यंदा तर ५० टक्के पीक बुडालं आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढेल; परंतु हंगामामध्ये भुईमुगाच्या किलोला रु. २.५० ते २.६० च्यावर भाव कधीही मिळाला नाही.
 उसाचा उत्पादन खर्च टनाला रु. २८८ पै. १० आहे. पण आतापर्यंत उसाला टनाला रु. १४२ मिळत आहेत.

 कांद्याच्या उत्पादन खर्च ७६ साली ४५ ते ६० रु. क्विटल होता. पण भाव मात्र रु. १८ ते २५ पर्यंतच मिळत होता. सध्या मात्र आम्ही सरकारची मानच पकडून ठेवली आहे त्यामुळे सध्या स्थिती बरी आहे.

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ३१