पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/56

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देतात, मुंबईच्या रंजना इंगळे नावाच्या वयस्क आजी वापरून झालेले प्लॅस्टिक मला आणून देण्यासाठी त्यांच्या मर्सिडीज गाडीतून येतात. आमचे दोन्ही व्याही श्री. केळकर आणि दापोलीचे श्री. करंदीकर, मित्तल टॉवरमधील नेहा दळवी, सौ. भावे, प्राची भिडे, अश्विनी जोगळेकर, लता मावशी पुण्याचे माधव आणि रेखा आणि सीमा वहिनी माझे मित्र सुमुख जोशी, आनंद ओक आणि देवेंद्र निमकर, नरेन्द्र आपटे वापरून झालेले प्लॅस्टिक त्यांच्या घरात जमा करून ठेवतात आणि जेव्हा भेटतील तेव्हा ते मला पाऊचमध्ये भरण्यासाठी आठवणीने देतात. ह्याशिवाय ज्यांची मला नावेदेखील माहीत नाहीत असे अनेक लोक आमच्या सोसायटीच्या वॉचमनच्या केबिनमध्ये वापरून झालेले प्लॅस्टिक माझ्यासाठी आणून ठेवतात. कळव्याच्या नेनेबाई, रत्नागिरीच्या सौ. करमरकर, अंबेजोगाईचे डॉ. खुरसाळे, पुण्याच्या सौ. विजया जोशी, रोह्याचे श्री. सुखद राणे आणि त्यांच्या सौ. समृद्धी राणे यांनी इंदूर ते नाशिक असा सायकल प्रवास करत असताना प्रवासात माझ्या प्रस्तुत पुस्तकाचे वाटप करून शून्य कचरा या संकल्पनेचा प्रचार केला. शून्य कचरा या संकल्पनेचा प्रचार करताना अनेक लोकांनी आपल्याला योग्य वाटेल' अशी पुस्तकाची किंमत अदा करून या कार्यात आर्थिक मदत केली आहे. मुंबई महानगर पालिकेने एक वर्ष त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या परीक्षेसाठी ‘शून्य कचरा' हे पुस्तक अभ्यासासाठी लावले होते. पुण्याच्या सौ. गोरे ह्यांनी संक्रांतीचे वाण म्हणून ही पुस्तके वाटली.
 ही सर्व माणसे कोण आहेत? ती सामान्य माणसे आहेत. या माणसांमध्ये एकही प्रसिद्ध व्यक्ती नाही, सेलिब्रेटीदेखील नाहीत किंवा राजकारणी नाहीत अथवा एकही सरकारी वरिष्ठ अधिकारी नाही. हा बदल सामान्य माणसात होतो आहे, म्हणजेच तो बदल मुळापासून होत आहे. प्रसिद्धीसाठी केलेला वरवरचा दिखाऊ बदल नाही.
 माणसांचे वागणे असे बदलायला हवे. ‘वापरून झालेली वस्तू टाकायची नाही हा त्यांचा श्वास व्हायला हवा.
 काय, हे शक्य आहे का? बारा वर्षांनंतर मागे वळून बघताना माझ्या अनुभवावरून मला तरी ते अशक्य वाटत नाही.
 हीच माझी एका तपाची कमाई !

 आणखीन काय हवे?


५४ * शून्य कचरा"'