पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/55

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४. सिंहावलोकन

 आज बारा वर्षानंतर काय साध्य झाले; असा जेव्हा मी विचार करू लागतो, तेव्हा असे लक्षात येते की, “वापरून झालेली वस्तू टाकायची नाही' हा माझा शरीरधर्म झालेला आहे. माझाच नव्हे तर आमच्या घरातील सर्वांचा. छोट्या स्वराला आणि विहानला तर ते जन्मापासून मिळालेले बाळकडूच आहे, असे म्हटले तर ते वावगे होणार नाही.
 शरीरधर्म म्हणजे जितक्या नकळत आम्ही श्वास घेत असतो, जितक्या अनाहूतपणे आम्ही सकाळी उठल्याबरोबर दात घासतो, बाहेर जाताना जितके नकळत आरशासमोर उभे राहून केसातून कंगवा फिरवून चेहऱ्याला पावडर लावतो; तितक्या सहजपणे आम्ही वापरून झालेल्या वस्तूंचे व्यवस्थापन करतो. ते करताना आम्हाला वेगळा विचार करावा लागत नाही. थोडादेखील त्रास होत नाही.
 ‘टाकायचे नाही, हेच शून्य कचरा या संकल्पनेचे सार आहे. आजमितीस ‘शून्य कचरा' या संकल्पनेच्या प्रसारासाठी शून्य कचरा या पुस्तकाच्या मराठीत १२,०००, हिंदीत १०००, गुजरातीत १०००, इंग्लिशमध्ये ३००० प्रती म्हणजे एकूण १७,००० प्रती समाजात वितरित झाल्या आहेत. मराठीची ही १३वी आवृत्ती प्रकाशीत झाली आहे. मराठी आणि इंग्लिशमधील संगणकीय पुस्तक (e-book) तयारच आहे. आजपर्यंत ते मी अनेक जणांना पाठवले आहे. अंदाजे दोन-तीनशे अविरत पात्रे मी लोकांना बनवून दिली आहेत. शून्य कचरा' या संकल्पनेवर अनेक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. ईटीव्ही आणि झी२४ तास, लोकमत News 18 ह्या वाहिन्यांवर माझ्या मुलाखती घेतल्या गेल्या आहेत. अनेक वृत्तपत्रे आणि मासिके ह्यांतून माझे लेख पसिद्ध झाले आहेत. १००,००० पॅकिंग पाउचेस बनवून मी ते आमच्या कारखान्यातून माल बाहेर पाठवताना वापरले आहेत. जर मी हे १००,००० पाउचेस केले नसते, तर ह्या पाउचेसमधले प्लॉस्टिक आसमंतात बागडत राहिले असते आणि आपला परिसर विद्रूप झाला असता.

 माझे पाउचेस करणे बघून अन् शून्य कचऱ्याबद्दल सतत ऐकून आमच्या सुनिता मावशीत केवढा बदल झाला. आज त्या ज्या दहा घरांत स्वयंपाक करण्यास जातात, त्या दहा घरांतून रोज सकाळ-संध्याकाळ येताना वापरून झालेले, स्वच्छ, मऊ, ज्याला बाजारात किंमत नाही, असे प्लॅस्टिक, पाउच बनवण्यासाठी घेऊन येतात. त्यांना मी काय देतो? काहीही नाही. सुनीता मावशीप्रमाणेच संगिता बागुल नावाच्या एक गृहिणी मला प्लॅस्टिक आणून


शून्य कचरा : सिंहावलोकन * ५३