पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

"टाकायला सोपं जातं ना!"
 मी दत्ताला नमस्कार केला आणि बाहेर पडलो. माझ्या डोक्यातून तो निर्माल्याचा ढीग काही जात नव्हता. आपण दत्ताचं काही तरी देणं लागतो असं सारखं वाटू लागलं. असहाय दत्त मला अस्वस्थ करू लागला.
 दुसऱ्या दिवशी मी फिरायला जाताना एक प्लॅस्टिकची पिशवी बरोबर घेऊन गेलो.
 देवळात पुजारी दत्तावरचे हार आणि फुलं उरतवत होते. मी त्यांना म्हणालो, "थांबा, ते हार आणि ती फुलं बाकीच्या निर्माल्यात न टाकता ह्या पिशवीत भरा. म्हणजे आपोआपच ती वेगळी होतील." पुजार्‍यांनी माझं ऐकलं. पण त्यांच्या पुढे प्रश्न होता आता पिशवीतील हारफुलांचे करायचं काय?
 मी त्यांची शंका लगेच दूर केली.
 "मी ह्या पिशवीतील हार आणि फुलं घरी घेऊन जाणार आहे." पुजारी माझ्याकडे बघतच राहिले.
 मी ती पिशवी घेऊन आलो. पिशवीतले हार आणि फुलं बाहेर काढली. हारातून फुलं वेगळी केली. फुलांच्या पाकळ्या वेगळ्या केल्या. पाकळ्यांच्या विघटनाच्या वेगापेक्षा हारातील दोच्यांचा विघटनाचा वेग कमी आहे म्हणून मला त्या निर्माल्यातून दोरा वेगळा काढायलाच हवा होता. मी एक बास्केट घेतली आणि त्यात त्या सर्व पाकळ्या भरल्या. माझ्या समोर दिसणारा फुलांचा ढीग दहाएक मिनीटांत इवलासा झाला.
 पुजार्‍यांना वाटलं होतं माझा उत्साह दोन दिवस टिकेल. मी मात्र आठवडाभर नियमितपणे दत्ताची सेवा करत होतो.
 आता पुजारीसुद्धा हार आणि फुलं माझ्यासाठी वेगळी काढून ठेवत होते.
 मी जेव्हा हारातून फुलं वेगळी काढायचो, तेव्हा दर दहा फुलांमागे एक घडी केलेलं पान मिळायचं. हारात पान का गुंफतात? मला प्रश्न पडायचा. हार चांगला दिसावा किंवा फुलांपेक्षा पानांची किंमत कमी हा व्यापारी दृष्टिकोण त्या पानांमागे दडला असणार हे सत्य नाकारता येत नाही.

 खरं तर झाडांची पानं तोडताच कामा नयेत. कारण पान हे झाडाचं नाक आहे. पण हे कोण कोणाला सांगणार? आणि कोण कोणाचं ऐकणार? मला एक युक्ती सुचली. मी पुजार्‍यांना हारात पान गुंफणं कसं चुकीचं आहे हे पटवून देऊ शकलो. मी त्यांना सांगितलं तुम्ही दत्ताच्या भक्तांना सांगा ह्या दत्ताला पानांची अॅलर्जी आहे.!


५० * शून्य कचरा