Jump to content

पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मनोगत

शून्य कचरा - अंतिम स्वच्छता - म्हणजेच वापरलेल्या वस्तूंचे किंवा नकोशा वस्तूंचे योग्य व्यवस्थापन. मी करत असलेले हे व्यवस्थापन बघायला अथवा त्याबद्दल चौकशी करायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी माझे हे लिखाण देत होतो, लोक ते उत्सुकतेने वाचत होते. काही थोडे लोक मी लिहिल्याप्रमाणे आचरणही सुरू करत होते. असे हस्ते-परहस्ते पोहचत-पोहचत काही मासिकांतून आणि वर्तमानपत्रांतून माझे हे लेख प्रसिद्ध झाले.
 दर खेपेला झेरॉक्स काढायचा त्रास होऊ लागला. शिवाय ते खर्चीकही होऊ लागलं. म्हणून एकदाच या सगळ्याची छपाई करावी आणि आपल्या नावावर एक पुस्तक रुजू करून घ्यावे ह्या द्वयर्थी उद्देशानी मी पुस्तकाच्या वाटेला लागलो.
 हे पुस्तक वाचून जे कोणी त्याप्रमाणे वागू लागतील त्यांनी एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवावी की; हे एक व्रत आहे, ते नेटाने पाळले, तर आपल्या वृत्ती बदलतात. स्वच्छता हा आपला गुणधर्म बनून जातो. प्रथम तुम्ही वागायला सुरुवात करा. तुमच्या घरातील लोक तुमचे बघून तुम्हाला साथ द्यायला लागतील.
 आमच्या घरातसुद्धा सौ. शरयू ताम्हनकरांना स्वच्छतेची अतिशय आवड आहे आणि तिच्या स्वच्छतेला आम्ही सर्व नेहमीच दाद देतो. तिला मदत करताकरताच ‘शून्य कचरा' ह्या संकल्पनेचा जन्म झाला आहे.
 ह्या पुस्तकाची किंमत काय ठेवावी हा मोठा गहन प्रश्न माझ्यासमोर होता. या पुस्तकाचा जर वापर झाला नाही, तर या कागदांचे मूल्य कच-यासारखे; पण जर वापर झाला, तर मूल्य हे अमूल्यच आहे. तेव्हा किमतीसमोर मी आपल्याला योग्य वाटेल ती अशी अक्षरी किंमत लिहिली आहे. ज्याला जेवढी वाटेल, तेवढी त्याने ती द्यावी. येणाऱ्या पैशांचा विनियोग ह्या पुस्तकाच्या प्रती काढून त्या वाटण्यातच केला जाईल एवढी हमी मी देतो.
 हे माझे पहिलेच पुस्तक कोणाला अर्पण करावे हाही एक प्रश्नच होता. ज्याला अर्पण करीन तो म्हणेल, “कसले हे कचऱ्याचे पुस्तक मला अर्पण केलेत!" त्यामुळे, ज्यांना कचरा आवडतो,अशाच व्यक्तींना, म्हणजेच 'वस्तू वापरून झाल्यावर तिला वाट्टेल तशी टाकून देणाऱ्या सर्व माणसांना' मी हे पुस्तक अर्पण करत आहे.
 हे पुस्तक तयार करताना माझे मित्र श्री. अरुण फडके यांनी शुद्धलेखनाच्या नजरेतून ते स्वच्छ केले. ह्या पुस्तकावर काम करताना त्यांनी दाखवलेली आत्मीयता आणि रस हा पुन्हापुन्हा वापरण्यासाठी मी जपून ठेवला आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानण्याचा औपचारिकपणा मी करणार नाही. श्री. विकास फडके ह्यांनी ह्या कचऱ्याच्या पुस्तकाला सुंदर मुखपृष्ठ बनवून दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. राजमुद्रा प्रिंटर्सच्या राजेंद्र फडक्यांनी ज्या तत्परतेने हे पुस्तक छापून दिले त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे.

--कौस्तुभ ताम्हनकर

*

शून्य कचरा * ३