पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
पातळ पिशवी प्लॅस्टिकची
१०. पापी प्लॅस्टिक


 अमरत्व घेऊन जन्मलेल्या प्लॅस्टिकला पापी अशी उपाधी लागावी, असा काय अपराध त्या प्लॅस्टिकने केला ? मानवाच्या अथक प्रयत्नांनतर प्लॅस्टिक बहुगुणी व बहुउपयोगी ठरले. मात्र, त्याचा नाश होत नाही हा त्याचा गुण, गुण न राहता अवगुण बनला. याला जबाबदार कोण, प्लॅस्टिक की आपण ?
 प्लॅस्टिकच्या पातळ पिशवीकडे आपण जरा वेगळ्या नजरेने बघू या. इतक्या कमी खर्चात, इतक्या कमी वजनात, इतक्या कमी जागेत मावणारी ही प्लॅस्टिकची पातळ पिशवी, कितीतरी किलो सामान इकडून तिकडे वाहून नेण्यासाठी आपल्या उपयोगी पडते, शिवाय तिला आपण वारंवारही वापरू शकतो.
 पण आपण असे करत नाही, कारण का, तर ही प्लॅस्टिकची पातळ पिशवी अगदी कवडीमोलाने, जवळजवळ फुकटच आपल्याला मिळत असते. फुकट मिळालेल्या कोणत्याही गोष्टीची किंमत नसते, असे म्हणतात ते खरे आहे.
 वस्तू वापरून झाल्यावर ती टाकून द्यायची, हे माणसाच्या नसानसांत मुरलेले आहे. या पातळ पिशवीमुळे किंवा कुठल्याही प्लॅस्टिकच्या आवरणामुळे आतला माल आपल्यापर्यंत सुस्थितीत पोहोचला आहे, याचा विचार माणूस क्षणभरही करत नाही. इतका शिकलेला माणूस असे का वागतो ? कारण असे वागणे ही त्याची सहज प्रवृत्ती आहे, आणि दुसरे कारण म्हणजे या वापरून झालेल्या प्लॅस्टिकचे करायचे काय ? या प्रश्नाचे उत्तर त्याला माहीत नाही आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या पातळ प्लॅस्टिकपासून त्याला पैसे मिळत नाहीत ! उद्या जर हे पातळ प्लॅस्टिक विकत घेतले जाऊ लागले, तर ते नक्कीच रस्त्यावर टाकले जाणार नाही.
 पण आज परिस्थिती अशी आहे की, सहज म्हणून कोठेही नजर फिरवा, आपल्याला पातळ प्लॅस्टिक दिसतेच दिसते. आज ते नुसते दिसते आहे; पण आपण जर वेळीच जागे झालो नाही, तर हेच इतस्तत: पडलेले प्लॅस्टिक आपले जगणे मुश्कील करेल किंवा सहज जगण्यासाठी आपल्याला जबरदस्त किंमत मोजावी लागेल.
 अनेक जण अनेक उपाय सुचवत असतात. ते तर आपण आचरणात आणलेच पाहिजेत. वापरून झालेल्या प्लॅस्टिकचे काहीतरी करू या, त्याला टाकून तरी नको देऊ या, एवढा कमीतकमी विचार जरी प्रत्येकाने केला, तरी एक पाऊल पुढे टाकल्यासारखे होईल.

 प्लॅस्टिक टाकून द्यायचे नाही हे एकदा ठरवल्यावर खरेदीला बाहेर पडताना आपण आपसूकच घरातील प्लॅस्टिकची पिशवी घेऊनच बाहेर पडू, आपण दुकानदारकडे पिशवी


पापी प्लॅस्टिक * ४३