पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 एवढे समजल्यावर एक मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे हे बॅक्टिरिआ आणायचे कोठून ? बाजारात आपल्याला अनेक बायोकल्चरर्स मिळतात. ह्या बायोकल्चरर्समध्ये हे बॅक्टिरिआ मोठ्या संख्येने एकवटलेले असतात. ही बायोकल्चरर्स डायल्यूट करून त्यांचा शिडकावा आपल्या साठविलेल्या कचऱ्यावर रोज केल्यास, हळूहळू कचऱ्यावरच बॅक्टिरिआंची वाढ होऊ लागते व ते रोगजंतूंवर हल्ला चढवितात.
 आंबविण्याच्या क्रियेतून प्रामुख्याने ही बायोकल्चरर्स तयार होतात. पाणी आणि उबदारपणा मिळाला की आंबण्याची क्रिया चालू होते आणि बॅक्टिरिआंचा जन्म होतो. आता ही गोष्ट सरळ, साधी, सोपी अन् स्पष्ट आहे की, ज्या आंबविण्याच्या क्रिया आपल्याला चालतात त्यातून रोगजंतूंचा जन्म नक्कीच होणार नाही. सजीवांना उपयुक्त असेच बॅक्टिरिआ यांतून निपजतील. अशा कुठल्या आंबविण्याच्या क्रिया ? याचा जरा शोध घेतला, तर आपल्याला पुढील आंबविण्याच्या क्रिया चटकन लक्षात येतील.
 १) दही २) यिस्ट ३) इडलीचे पीठ ४) अनारशाचे पीठ ५) बिअर ६) देशी दारू ७) नारळाचे पाणी - निरा, ताडी, माडी हे पदार्थ एक प्रकारची बायोकल्चरर्सच आहेत. हे पदार्थ जर आपण कचऱ्याच्या ढिगावर टाकले, तर आपले उद्दिष्ट साध्य होईल.
 बऱ्याच वेळा कचऱ्यावर चिलटे जमा झालेली दिसतात. चिलटे दुर्गंधीला आकृष्ट होतात, म्हणूनच ती प्रामुख्याने घाणीवर जमा होतात. म्हणजे चिलटे जमा होणे हे सडण्याची क्रिया सुरू झाल्याचे द्योतक आहे. तेव्हा चिलटे दिसली की त्या कचऱ्यावर लगेच बायोकल्चर्सचा मारा सुरू करावा. म्हणजे कचऱ्यात उपयुक्त बॅक्टिरिआची वाढ होऊ लागेल. हे बॅक्टिरिआ प्रथम रोगजंतूंवर हल्ला करतील. ह्याचे उत्सर्जन हे कचऱ्यातील किडे आणि गांडुळे यांचे उपयुक्त अन् पोषक खाद्य असेल, त्यामुळे कचरा फस्त करणाच्या गांडुळांची संख्या वाढेल व हळूहळू सडण्याच्या क्रियेचे रूपांतर कुजण्याच्या क्रियेत होईल. यासाठी काही कालावधी निश्चितपणे जाईल. तोपर्यंत चिलटांचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल, तर काट्याने काटा काढावा.

 म्हणजे कसे, तर चिलटे घाण वासाला आकृष्ट होतात, तर आपण या वासाला प्रतिवासाचे अस्त्र चिलटांवर सोडायचे, आपल्या दैनंदिन जीवनात उग्र वासांचे अनेक पदार्थ सहज उपलब्ध असतात. यादीच करायची झाली, तर..... १) झेंडूची फुले २) गवती चहा ३) बिना साखरेच्या चहाचा वापरलेला चोथा ४) कुंपणाला लावतात ती मेंदीची पाने ५) कडुलिंब ६) करंज्याच्या बियांची पेंड ७) ओव्याच्या झाडाची पाने ८) सीताफळाच्या झाडाची पाने ९) सीताफळाचे साल १०) कांद्याचा रस ११) लिंबाच्या सालीची पूड १२) कडू कारले १३) मिठाचे सौम्य पाणी १४) पापडखार १५) वेखंडाची पावडर १६) शिकेकाई

४० * शून्य कचरा