पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९. कचरा निर्मूलन - एक युद्ध

 निसर्गतः कोणत्याही पदार्थाचे विघटन होताना ज्वलनाची क्रिया घडत असते. कचऱ्याच्या बाबतीतही हे असेच घडते. कचरा मंदज्वलन क्रियेने विघटन पावतो.
 जेव्हा हवा न लागता मंदज्वलन होते, तेव्हा त्या ज्वलनाला सडणे असे म्हणतात. या क्रियेत प्रामुख्याने घाण वास बाहेर पडतो. हा घाण वास का बाहेर पडतो ? कारण ही क्रिया घडत असताना हायड्रोजन सल्फाईड, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन, अमोनिया आणि फॉस्फाईन असे विषारी व घाण वास असलेले वायू बाहेर पडत असतात. त्याचबरोबर सडण्याच्या क्रियेत रोगजंतूंचीही वाढ होते, कारण ते वातावरण रोगजंतूंच्या वाढीस पोषक असते. इतर ज्वलनांप्रमाणे या ज्वलनातून कार्बन डाय ऑक्साईड हाही वायू बाहेर पडत असतो.
 सडण्याची क्रिया आपल्याला हानिकारक असते, म्हणूनच कचरा निर्मूलनातील सडण्याची क्रिया टाळायची असते. सडण्याच्या क्रियेचे रूपांतर कुजण्याच्या क्रियेत होण्यासाठी आवश्यक असतो तो जरासा ओलावा अन् भरपूर खेळती हवा. ह्या दोनच गोष्टी मिळाल्यावर प्रथम नाहीसा होतो तो वास (दुर्गंधी). एकदा वास बंद झाल्यावर समजावे की, सडण्याचे रूपांतर कुजण्यात होते आहे. आणि असे झाल्यावर आजूबाजूच्या सर्व सजीवांना जगणे सुसह्य होऊ लागेल.
 हवा आणि पाणी यांव्यतिरिक्त आणखीही काही गोष्टींनी आपल्याला कुजण्याची क्रिया गतिमान आणि सजीवांसाठी उपयुक्त अशी करता येते. कुजण्याच्या क्रियेतसुद्धा कार्बनडाय-ऑक्साईड व रोगजंतू यांची वाढ होत असते, पण सडण्यापेक्षा कुजण्याच्या क्रियेत रोगजंतूंची वाढ अल्प प्रमाणात होत असते.
 हवा आणि पाणी देऊन आपण वास तर थांबवला, आता आपल्याला हल्ला करावयाचा आहे तो निर्माण होणाऱ्या रोगजंतूंवर. यासाठी आपल्याला असे काही बॅक्टिरिआ तेथे निर्माण करावे लागतील की, ज्यांचे अन्न हे ‘रोगजंतू' आहेत आणि त्या बॅक्टिरिआंचे उत्सर्जन सजीवांसाठी हानिकारक नाही.

 फोटो सिंथेटिक, अॅक्टिनो मायसेटिस, लॅक्टिक अॅसिड आणि यिस्ट या पदार्थांमधून आपल्याला अपेक्षित आहेत असे बॅक्टीरिआ मिळू शकतात. हे बॅक्टिरिआ रोगजंतूना खातात व त्यांच्या उत्सर्जनातून अॅमिनो अॅसिडस, साखर, फॉस्फेट आणि सल्फेट असे पदार्थ बाहेर पडतात. या पदार्थांचा फायदा कचऱ्यातील गांडूळांना व इतर कृमींना होतो. या पदार्थांवर त्यांचे चांगले पोषण होते व त्यांची वाढ होऊ लागते.


कचरा निर्मूलन - एक युद्ध * ३९