पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/39

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कॉन्फरन्समध्ये लावायला देतात ते छातीवर लावायचे प्लॅस्टिकचे बिल्ले, बल्ब्ज, ट्यूब्ज, प्लॅस्टिकची घासणी, औषधाच्या स्ट्रिप्स, प्लॅस्टिकचे चमचे, प्लॅस्टिकची भांडी वगैरे, वगैरे....
कवडीमोलाच्या वस्तू :
 वरील सर्व वापरून झालेल्या वस्तूंना जुन्या बाजारात किंमत मिळते. बाजारात अजिबात किंमत मिळत नाही अशी वस्तू म्हणजे पातळ प्लॅस्टिकच्या पिशव्या; गुटका, पानपराग, शांपू यांची छोटी प्लॅस्टिकची पाकिटे, प्लॅस्टिकचे दोरे, तुटलेले रबर बॅण्ड; वेफर्स, पॉपकॉर्न बिस्किटे यांची रॅपर्स; चॉकलेट, गोळ्या यांची प्लॅस्टिकची आवरणे; चहाचे कप इत्यादी. थोडासा विचार केला, तर या मंडळींनाही आपल्याला कामाला लावता येईल. कसे ते दहाव्या प्रकरणात वाचा.
 नारळाच्या करवंट्यांसाठी वेगळी पिशवी लावावी. या करवंट्या अविरतपात्रात टाकू नयेत. कारण नारळाच्या करवंट्यांचे मातीत रूपांतर होण्यासाठी सर्वात जास्त वेळ लागतो. या करवंट्या जळणासाठी वापरल्या जातात. करवंट्या एकत्र मिळाल्या, तर त्याचा जळणासाठी वापर करणाऱ्याला आनंदच होईल.
 यापेक्षा वेगळ्या प्रकारचा कचरा एखाद्या घरात तयार होत असेलही. एकदा जर का आपण मनापासून ठरवले की, मी कचरा निर्माण होऊ देणार नाही, तर त्या वेगळ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे उत्तर आपल्याला निश्चित मिळेल आणि त्या नको असलेल्या वस्तूला कचऱ्याच्या कुंडीचा रस्ता आपण नक्कीच दाखविणार नाही.

*
ट्यूब आणि पेस्ट ह्यांचा पूर्ण, स्वच्छ वापर !

 कुठल्याही पेस्टच्या ट्यूबमधून आतला पदार्थ (पेस्ट) ती ट्यूब दाबूनदाबून बाहेर काढायचा आपण आटोकाट प्रयत्न करतो. तरीपण आपल्याला सर्व पेस्ट काही बाहेर काढता येत नाही. सर्व पेस्ट बाहेर काढण्यासाठी ट्यूब गळ्यातून कापा आणि ट्यूबची खालची बाजू सुरीने उघडा. आता, सहाणेवरून आपण जसे गंध काढतो, तशी पेस्ट काढून घ्या. विशेषतः ही पेस्ट जर दात घासायची पेस्ट असेल, तर ती भांडी घासायच्या साबणाच्या डब्यात टाका. ती आपोआप वापरली जाईल. पेस्टची ट्यूब स्वच्छ झाल्यामुळे ती विकत घेणा-याला ती घेताना आनंद होईल आणि वापरून झालेल्या वस्तूचे योग्य व्यवस्थापन केल्याचे समाधान आपल्याला मिळेल.


शून्य कचरा : प्रत्यक्ष कृती * ३७