पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ह्या सर्व सामानाची मांडणी पुढीलप्रमाणे करावी -
१. प्लॅस्टिकच्या जाळीदार बास्केटला खालच्या बाजूला भोके नसल्यास भोके पाडून घ्यावीत.
२. प्लॅस्टिकच्या बास्केटला चार टोकांस चार फोटो रोल डब्या जोडून घ्याव्यात.
३. चार पाय असलेली प्लॅस्टिकची बास्केट प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये ठेवावी.
४. प्लॅस्टिकच्या बास्केटमध्ये नारळाच्या शेंड्या व उसाची चिपाडे पसरवावीत. त्यावर थोडेस सुकलेले शेण व गांडूळखत टाकावे व हलकासा पाण्याचा फवारा मारावा आणि या प्लॅस्टिकच्या बास्केटमध्ये चारपाच गांडुळे सोडावीत. आता ही प्लॅस्टिकची बास्केट तुमच्या घरातील नको असलेले सर्व जैविक पदार्थ पचविण्यास तयार झाली आहे. तुम्ही नको असलेले जैविक पदार्थ वरून या प्लॅस्टिकच्या बास्केटमध्ये टाकत जा, शक्य असल्यास हे बारीक केलेले पदार्थ मातीत घोळवून घ्या. गांडुळे त्याचे रूपांतर गांडूळखतात करतील. ही क्रिया सतत चालू राहील. म्हणूनच या प्लॅस्टिकच्या बास्केटला आपण 'अविरतपात्र' असे म्हणणार आहोत.
५. घरात निर्माण होणारे सर्व जैविक पदार्थ अविरतपात्रात बारीक करून टाकावेत त्यासाठी घरातील सुरी, चाकू, विळी अथवा कात्री यांचा वापर करावा. मिक्सर किंवा फूड प्रोसेसरवर हे पदार्थ बारीक करून टाकल्यास अति उत्तम.

६. वापरून झालेले जे जैविक पदार्थ बारीक करून अविरत पात्रात टाकले आहेत,त्यांच्यावर साधारण आठ-पंधरा दिवासांनी गांडूळखत अथवा शेणखत आणि मातीचे मिश्रण यांचा पातळसा थर द्यावा. तीन चार महिन्यांनी त्यात नारळाच्या शेंड्या आणि उसाची चिपाडे टाकावीत.


शून्य कचरा : प्रत्यक्ष कृती * ३३