पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/33

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 प्रत्येक घरात गांडूळखत-प्रकल्प ही कदाचित अशक्यप्राय कल्पना असेल, पण प्रत्येक घरातून निर्भेळ असा जैविक पदार्थाचा साठा मिळायला काय हरकत आहे ? जो सामान्य माणूस बाजारातील भेसळीबद्दल तावातावाने ओरडत असतो, त्या सामान्य माणसाने उत्कृष्ट प्रतीचा, विनाभेसळ असा जैविक पदार्थांचा साठा नगरपालिकेला द्यायची जबाबदारी का उचलू नये ?
 कशी गंमत आहे बघा, आपण कचरासुद्धा दर्जेदार करू शकत नाही ! त्यातसुद्धा भेसळ! आणि ती कोण करते ?
 भेसळीविरुद्ध टाहो फोडणारा सामान्य माणूसच !

"आपण हे सहज करू शकतो."

 पाठीवर भला मोठा झोला घेऊन, कचरा कुंडीतून प्लॅस्टिक, पुठे, कागद गोळा करणाच्या बायका आपण नेहमी बघतो. किती घाणीत काम करावे लागते त्यांना ! त्यांचे नशीब आपण बदलू शकू का ? हो.... जर आपण ठरवले, तर नक्कीच!
 थोडासा विचार बदलला आणि थोडेसे आचरण बदलले तर हे सहज साध्य होईल.
 कचराकुंडीत जाणारे प्लॅस्टिक आपल्या घरातूनच जात असते. हे प्लॅस्टिक वेळीच वेगळे केले, स्वच्छ केले, घरात एका कोपऱ्यात साठवून ठेवले आणि या प्लॅस्टिक गोळा करणाऱ्या बायकांना एक दिवस सन्मानाने घरी बोलावून हे स्वच्छ, चांगले पण आपल्याला नको असलेले प्लॅस्टिक त्यांना दिले, तर त्यांना किती बरे वाटेल ! असे प्लॅस्टिक घेताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली स्मितरेषा पाहून तुम्ही सुखावून जाल.
 आजकाल शॉर्टकटचा जमाना आहे. आपल्या घरात नको असलेले प्लॅस्टिक कचराकुंडीत आणि तिथून बायकांच्या झोळ्यात जाण्याऐवजी, आपल्या घरातून थेट त्यांच्या झोळ्यात पडले, तर सर्वांचाच फायदा आहे.
 लक्षात आले, समजले, पटले अन् उमगले; तर असे वागणे खरेच काही अवघड नाही.
 एकदा प्रयत्न तर करून बघा !


दर्जेदार कचरा - दाखवाल का निर्माण करून ? * ३१